

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : ठाणेकरांचे ग्रामदैवत असलेले ऐतिहासिक श्री कौपिनेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक फुलांच्या सजावटीने बहरून गेले आहे. सुमारे ११०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात भाविकांच्या स्वागतासाठी विशेष दर्शन व्यवस्था, स्वतंत्र रांगा आणि रात्रभर अभिषेक-पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा मंदिर परिसर केसरी व पिवळ्या गोंड्यांच्या माळा, लाल व गुलाबी गुलाब तसेच हिरव्यागार पानांच्या सजावटीने नटला आहे. सुमारे १० ते १२ फुटांहून अधिक उंचीचे पुरातन शिवलिंग राज्यातील सर्वात मोठ्या पिंडींपैकी एक मानले जाते. या भव्य शिवलिंगाभोवती हजारो फुलांच्या माळांनी देखणी सजावट करण्यात आली आहे. परिसरातील इतर देवस्थानांनाही फुलांनी सुशोभित करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे. गर्दी लक्षात घेता प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. ७० वर्षांवरील नागरिकांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना नियमांचे पालन करून वेळेत दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील इतर शिवमंदिरांमध्येही महाशिवरात्रीनिमित्त चोख व्यवस्था करण्यात आली आहे. शिळफाटा येथील खिडकाळेश्वर मंदिरातही भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागण्याची शक्यता असून ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
विशेष नियोजन व सुविधा
* महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा
* ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा
* रात्रभर अभिषेक व पूजन व्यवस्था
* सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त
* प्रवेश व निर्गमनासाठी नवीन नियम
असे मार्ग
द्वार क्र. १ (नंदीसमोरील मुख्य प्रवेशद्वार) : सर्वसामान्य भाविकांसाठी प्रवेश
द्वार क्र. २ (मारुती मंदिराजवळ) : ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग व टोकनधारकांसाठी राखीव
द्वार क्र. ३ (भाजीमंडईजवळ) : बाहेर पडण्यासाठी
द्वार क्र. ४ (मासुंदा तलावाजवळ): अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अत्यावश्यक सेवांसाठी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.