विकासाच्या पायाभरणीत ‘सा.बा.’चा खारीचा वाटा

विकासाच्या पायाभरणीत ‘सा.बा.’चा खारीचा वाटा

Published on

पायाभूत सुविधांचा वेगवान विकास
ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची भक्कम पायाभरणी

राहुल क्षीरसागर
मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत ठाण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे रस्ते, आरोग्य सुविधा, प्रशासकीय कार्यालये आणि शासकीय सेवांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, महामार्गावरील रस्त्यांची उभारणी, सुपरस्पेशालिटी जिल्हा रुग्णालयाची निर्मिती, नवीन शासकीय विश्रामगृह, तसेच तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यासह शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास, अशी अनेक विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रगतिपथावर आहेत.


१) कापूरबावडी येथे अत्याधुनिक शासकीय विश्रामगृह
वाढत्या शासकीय दौऱ्यांमुळे कोर्ट नाका येथील विद्यमान विश्रामगृह अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी येथे नवीन अत्याधुनिक विश्रामगृह उभारले जात आहे.

नवीन विश्रामगृहाची वैशिष्ट्ये :
तळ अधिक चारमजली इमारत
चार व्हीव्हीआयपी सूट
२४ उच्च दर्जाचे सूट
सर्वसामान्यांसाठी आठ खोल्या
७० चारचाकी वाहनांचे पार्किंग
१५० दुचाकी वाहनांची सुविधा
यामुळे मान्यवरांच्या मुक्कामासाठी सुसज्ज व प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार आहेत.

एकाच छताखाली प्रशासन (भव्य शासकीय संकुल)
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील तहसील कार्यालय व जुन्या शासकीय इमारतींचा प्रशासनाकडून एकत्रित पुनर्विकास करण्यात येत आहे.

प्रस्तावित इमारतीची रचना
दोन बेसमेंट (तळमजला)
चार पोडियम
१९ मजले

या इमारतीत असणार :
सार्वजनिक बांधकाम मंडळ
तहसील कार्यालय
अग्निशमन विभाग
ठाणे नगर पोलिस स्‍थानक
महावितरण
महापालिका कार्यालय
जिल्हा परिषद
तळमजल्यावर नागरिकांसाठी सेवा-सुविधा व काही व्यावसायिक दुकाने प्रस्तावित आहेत. या बहुउद्देशीय संकुलामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होणार आहे.

मनोरुग्णालयाचा कायापालट
१९०१-०२ मध्ये स्थापन झालेले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय हे राज्यातील महत्त्वाचे मानसिक आरोग्य केंद्र आहे; मात्र १२० वर्षांहून जुनी इमारत जीर्ण झाल्याने पुनर्विकास अपरिहार्य ठरला.
प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्प
६७५ कोटींचा प्रस्ताव
५६० कोटींची शासनमान्यता
महिला वॉर्डचे काम सुरू

नवीन सुविधांमध्ये
घनकचरा व्यवस्थापन
रेन वॉटर हार्वेस्टिंग
सौरऊर्जा प्रणाली
अपंगांसाठी रॅम्प
आधुनिक अग्निशमन यंत्रणा
अंतर्गत रस्ते व पार्किंग
मानसिक आरोग्यसेवेला नवे अधिष्ठान


आरोग्यसेवेला नवे बळ
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी जिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन हे रुग्णालय प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्याचा पाठपुराव्यासह त्यांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून होते. आज हे रुग्णालय प्रत्यक्षात उभे राहिले असून या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा ठाणे जिल्ह्यासह पालघर, रायगड जिल्ह्यातील रुग्णांना वरदान ठरणार आहे. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवे बळ मिळणार आहे.
ठाण्यातील सुपरस्पेशालिटी जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात असून लवकरच लोकार्पण अपेक्षित आहे.

मुख्य वैशिष्ट्ये :
दुपटीहून अधिक खाट क्षमता
अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री
प्रगत उपचार सुविधा
रुग्णालय हेलिपॅड
महामार्गावरील अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने उपचार शक्य होणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या माहितीनुसार, एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

रस्ते प्रकल्पाची स्थिती
मनोर- वाडा- भिवंडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच अनेक जीवघेणे अपघात घडले होते. या पट्ट्यांमध्ये प्राधान्याने काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. मनोर- वाडा रस्ता या टप्प्यात सध्या उजव्या बाजूस एक किलोमीटरपर्यंत माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. यादरम्यान खोदकाम सुरू असून, मातीभराव काम प्रगतिपथावर आहे. दुसरीकडे वाडा ते डाकिवली या टप्प्यात १०.८५० किलोमीटरचे माती भराव, ९.७५० कि.मी. जीएसबी (ग्रॅन्युलर सब बेस), ९.२५० कि.मी. डीएलसी (ड्राय लीन काँक्रीट) आणि ७.२०० कि.मी. पीक्यूसी पूर्ण झाले आहे. तसेच डाकिवली फाटा ते भिवंडी या टप्प्यात ६.५२ कि.मी. माती भराव, ५.७४ कि.मी. जीएसबी, ५.३३ कि.मी. डीएलसी आणि ३.५१ कि.मी. काम पूर्ण करण्यात आले आहे.

चिंचोटी- कामण- मानकोली मार्गासाठी १६.५९ कोटींचा निधी
भिवंडी तालुक्यातील चिंचोटी- कामण- मानकोली यादरम्यान रस्त्याच्या सुधारणा व काँक्रीटीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गती मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ३१६.५९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत मातीचा भराव व सबग्रेड तयार करणे, काँक्रीट पेव्हमेंट, ओपन व आरसीसी गटारे, पाइप, बॉक्स, स्लॅब कल्व्हर्ट, लहान पूल, रोड फर्निचर तसेच इतर पूरक कामांचा समावेश आहे. रस्त्यावर सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित ठेवण्यात आली आहे. आवश्यक सर्व मंजुरी प्राप्त झाल्या असून प्रकल्प अंमलबजावणीत कोणतेही अडथळे नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

विकासाच्या वेगाला ‘सा.बां.’चा कणा
ठाणे जिल्हा आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. रस्ते, प्रशासकीय संकुले, विश्रामगृह, मनोरुग्णालयाचा पुनर्विकास आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालय यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याचा विकास अधिक गतीमान होत आहे. या सर्व विकासाच्या पायाभरणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा खारीचा वाटा निर्णायक ठरत असून ठाण्याच्या भविष्यातील शहररचनेत या विभागाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com