पनवेलमध्ये ‘स्वच्छ वॉर्ड रँकिंग स्पर्धा २०२६’

पनवेलमध्ये ‘स्वच्छ वॉर्ड रँकिंग स्पर्धा २०२६’

Published on

पनवेलमध्ये ‘स्वच्छ वॉर्ड रँकिंग स्पर्धा २०२६’
नागरिकांचा सहभाग, १,५०० गुणांवर मूल्यमापन, आकर्षक रोख पारितोषिके
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेल महापालिकाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वॉर्ड रँकिंग स्पर्धा २०२६’मुळे शहरात स्वच्छतेची चळवळ अधिक बळकट होणार आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, पारदर्शक मूल्यमापन प्रक्रिया आणि प्रोत्साहनपर रोख पारितोषिके यांच्या माध्यमातून पनवेल स्वच्छतेत नवा आदर्श निर्माण करणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया ११ ते २० फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असून, गृहनिर्माण संस्था, शाळा, हॉटेल्स, शासकीय कार्यालये, रुग्णालये आणि मार्केट्स यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे. या स्पर्धेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे प्रभागस्तरावर २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष स्थळ पाहणी होणार असून, त्यातून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. या निवडलेल्या स्पर्धकांचे शहरस्तरीय समितीकडून पुनर्मूल्यांकन होऊन अंतिम गुणांकन निश्चित करण्यात येणार आहे.
कचरा वर्गीकरण, दैनंदिन स्वच्छता, शून्य कचरा उपक्रमाची अंमलबजावणी, परिसराची देखभाल आणि जनजागृती या निकषांवर आधारित एकूण १,५०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ बक्षिसापुरती मर्यादित न राहता स्वच्छतेची सवय रुजविण्याचा व्यापक उपक्रम ठरणार आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल १ मार्च २०२६ला जाहीर होणार असून, त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थांसाठी प्रथम पारितोषिक २१ हजार, द्वितीय १५ हजार व तृतीय ११ हजार अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शाळा व हॉटेल्ससाठी अनुक्रमे १५ हजार, ११ हजार व ५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत, तर शासकीय कार्यालये, रुग्णालये व मार्केट्सना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती वाढण्यासोबतच लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पनवेल घडविण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले जात असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com