ठाण्यातील ५५५ विहिरी होणार कार्यक्षम

ठाण्यातील ५५५ विहिरी होणार कार्यक्षम

Published on

ठाणेकरांना उन्हाळ्यात दिलासा
५५५ विहिरींचे होणार पुनरुज्जीवन; पालिकेकडून १ कोटींच्या निधीची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. ठाणे शहरातील पारंपरिक जलस्रोत पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी पालिकेने व्यापक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५५५ विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी एक कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
पालिका हद्दीत सध्या ५५५ विहिरींची नोंद असून त्यापैकी ३५० विहिरी महापालिकेच्या मालकीच्या तर २०५ विहिरी खासगी मालकीच्या आहेत. या सर्व विहिरींची तांत्रिक पाहणी करून वापरण्यायोग्य विहिरींची यादी तयार केली जात आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील विहिरींची तपासणी करून दुरुस्तीसह स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः विहिरींमधील गाळ उपसा, तडे गेलेल्या भिंतींची दुरुस्ती, दूषित पाण्याची तपासणी यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
काही भागांत सांडपाण्याच्या गळतीमुळे विहिरींचे पाणी दूषित झाल्याचे निदर्शनास आले असून अशा ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार आहेत. याआधी प्रस्तावित २५ विहिरींपैकी १० विहिरींची दुरुस्ती पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

पाणी टंचाईवर पर्यायी उतारा
१ घोडबंदर परिसरात अनेक गृहनिर्माण संकुलांना अद्याप टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मर्यादित जलस्रोतांमुळे पाणीपुरवठ्यावर ताण येत असल्याचे चित्र आहे. सध्या शहराला दररोज सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणी चार स्रोतांतून पुरवले जाते; मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत ते अपुरे पडत आहे.
२ महापालिकेचा उद्देश पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्याचा असून विहिरींचे पाणी कपडे धुणे, स्वच्छता, बागकाम आदी कामांसाठी वापरण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच नियोजनबद्ध उपाययोजना राबवून संभाव्य टंचाई टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com