महाशिवरात्रीला टिटवाळा शिवमय;
महाशिवरात्रीला टिटवाळा शिवमय
भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी
टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (ता. १५) संपूर्ण टिटवाळा शहर शिवमय झालेले पाहायला मिळाले. पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमत होता. मढ येथील श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान विशेष आकर्षण ठरले. या ठिकाणी शिवभक्तांनी मोठी हजेरी लावली होती.
मध्यरात्री १२ वाजता काळू नदी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करून भक्तांनी गोरजेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या भागांतून आलेल्या भाविकांनी देवस्थान परिसर गच्च भरून गेला होता. मंदिर विश्वस्तांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, प्रवचने, भजन-कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भक्तिमय केले.
टिटवाळा पूर्वेकडील स्थानकलगत असलेले शिवमंदिर आणि ४२ वर्षे जुने असलेले टिटवाळा शिवमंदिर आणि झेंडूच्या फुलांनी सजलेले मंदिर विशेष आकर्षण ठरले. येथील व्यवस्थापन गजानन मढवी व विनायक भोय यांनी केले होते. वासुंद्री येथील पांडवकालीन शिवमंदिर, मांडा पश्चिम येथील महाकालेश्वर मंदिर या ठिकाणी हेमंत भोईर, विनायक भोईर आणि लाला पाटील यांसह अनेक ग्रामस्थांनी चोख नियोजन ठेवले होते. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर प्रांगणात स्थापित शिवपिंड येथेही भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुंगारेश्वर येथील सदानंद महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केलेल्या शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळूंनी मोठी रांग लावली. या ठिकाणी बाबा अमरनाथ येथील देखावा साकारण्यात आला होता. भाविकांनी पिंडीवर दुग्धाभिषेक करीत महादेवाची मनोभावे पूजाअर्चा केली. तसेच रिजन्सी परिसरातील मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने उजळून निघाले होते.
५०० किलो खिचडी प्रसादाचे वाटप
सकाळपासूनच दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, महाआरती अशा विविध धार्मिक विधींमध्ये भाविक सहभागी झाले. माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोईर यांच्या वतीने ५०० किलो खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. वासुंद्री येथील जत्रेत उद्योजक विजय पाटील यांच्या वतीने खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जत्रेत सहभाग घेतला. जत्रेमुळे छोट्या विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना चांगला आधार मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

