भिवंडीत महायुतीत मिठाचा खडा

भिवंडीत महायुतीत मिठाचा खडा

Published on

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महापौरपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच आता शिवसेनेने उडी घेतल्याने चुरस वाढली आहे. कोणार्क विकास आघाडीचे नेते, माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने भिवंडीच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. पाटील यांच्या अटकनाट्यानंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातच मिठाचा खडा पडला आहे.

निवडणूक निकालानंतर भाजप २२, शिवसेना १२ आणि एक अपक्ष अशी ३५ नगरसेवकांची गोळाबेरीज महायुतीकडे होत होती. मोठा भाऊ म्हणून भाजपला महापौरपदाचे समीकरण जुळवण्याची संधी शिवसेनेने दिली, मात्र २२ दिवसांत भाजप बहुमताची जुळवाजुळव दाखवू शकला नाही. शहर पक्षनेतृत्वाकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे प्रदेश नेतृत्वाकडे निर्णय घेण्यासाठी सोपवली. तो निर्णय होण्यापूर्वीच भाजपचे सदस्य दोन गटांत विभागले गेल्याने पक्षातील दुफळी समोर आली. ते कमी म्हणून की काय प्रदेशनेतृत्वाने महापौरपदासाठी चौधरी यांचे नाव घोषित केल्यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी चौधरी यांच्यावर आक्षेप घेत प्रदेश नेतृत्वाच्या पत्रावर शंका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राड्याप्रकरणी फरार असलेले विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आणि पुन्हा महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत भरली. त्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संधान बांधल्याने पाटील यांच्यावर महापौरपदाची मदार सोपवली. यावरून महायुतीतच सत्तासंघर्षावरून जुंपल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पाटील यांच्या अटकेनंतर शिवसेनेने बंद पुकारून एक प्रकारे त्यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

उमेदवारी अर्जाकडे लक्ष
विलास पाटील यांनी सोमवारी (ता. १६) महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज केला आहे. ते कोणाच्या वतीने अर्ज दाखल करतात, भाजपकडून किती अर्ज दाखल होतात, यावरून महायुतीत त्यांच्यात जुळून आले की त्यांच्यातील दरी वाढली, हे समोर येणार आहे. महापौर निवडणूक भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केल्याने ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com