वसई नगरीत भक्तीचे चैतन्य

वसई नगरीत भक्तीचे चैतन्य

Published on

वसईनगरीत भक्तीचे चैतन्य
‘हर हर महादेव’चा जयघोष, शिवभक्तांची अलोट गर्दी

वसई, ता. १५ (बातमीदार) ः देशभरातील सर्व शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (ता. १५) शिवभक्तांची अलोट गर्दी पाहण्यास मिळाली. तेच चैतन्यमय वातावरण वसईनगरीतही पाहण्यास मिळाले. ‘शिवशंभो, हर हर महादेव’च्या जयघोषाने येथील परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.
येथील प्रत्येक मंदिरात शंकराच्या पिंडीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला. भजन, प्रवचन, पारायण, शिवपुराणासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी भाविकांना पेयजलाची, दूध, फळांची व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली होती, तर मंदिर विश्वस्तांनी उपवासाच्या फराळाचीदेखील सोय केली होती. वसई तालुक्यातील ज्येष्ठ, लहान मुले, महिला तसेच तरुण भोलेनाथाच्या चरणी लीन झाल्याचे चित्र होते.
वसईच्या सातिवली तुंगारेश्वर येथील ऐतिहासिक पुरातन महादेव मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांची रेलचेल सुरू होती. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लांबून भाविक आले होते. हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून स्वयंसेवक नेमण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अत्यंत भक्तिमय वातावरण, महादेवाच्या नामस्मरणात भाविक तल्लीन झाले होते.
-----------------------
चौकट
अनेक मंदिरांत लांबच लांब रांगा
वसई तालुक्यातील निर्मळ महादेव मंदिर, सोपारा चक्रेश्वर, वसई पूर्वेकडील मिठागर, पश्चिमेकडील दिवाणमान, वसई गाव, गोखीवरे काशीविश्वेश्वर, नायगाव, विरार यासह अन्य परिसरात असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शंकराला आवडते बेलपत्र वाहून मनोभावे पूजा करण्यात भाविक तल्लीन झाले होते. सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची मोठ्या संख्येने पावले मंदिरात वळली होती. त्यामुळे बेलपत्रालादेखील मागणी वाढल्याचे दिसून आले.
---------
हिंदू-मुस्लिम ऐक्य
महाशिवरात्रीनिमित्ताने वसईत हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हाजी पटेल यांनी वसई पश्चिम वर्तक महाविद्यालयाजवळील शंकर मंदिरात प्रसादाचे आयोजन केले होते. महाशिवरात्री उत्सवात सर्वधर्मसमभाव जपला गेला, हे उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक शेखर धुरी व समाजसेवक संजय अच्छीपालिया यांनी या वेळी दिली.
-----
फोटो ओळ
वसई : भाविकांनी गाभाऱ्यात शिवशंभोची मनोभावे पूजा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com