महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

Published on

खारघरमधील पुरातन शिवमंदिरांत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
खारघर, ता. १५ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त खारघर परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सेक्टर १२ मधील पुरातन देवाळेश्वर शिवमंदिर, तळोजा मध्यवर्ती कारागृहाजवळ डोंगराच्या पायथ्याशी असलेले स्वयंभू शिवमंदिर तसेच मुर्बी गावातील श्री महादेव मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
खारघरवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या देवाळेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासून अभिषेकानंतर दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर परिसरात भजन, हरिपाठ व धार्मिक कार्यक्रम रंगले. महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेमुळे नवरंग सर्कल ते चेरेबा मंदिर मार्गावर विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती.
भाविकांच्या सुरक्षेसाठी खारघर पोलिस व वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता. टेकडीवरील स्वयंभू शिवमंदिरात निसर्गरम्य वातावरणात कुटुंबांसह दर्शनासाठी गर्दी झाली. सर्व मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
---------------------------------
श्री लांघेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
उलवे, ता. १५ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त उलवे नोडमधील मोरावे येथील श्री लांघेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी उसळली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
शिवलिंगाचा जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बिल्वपत्र अर्पण, रुद्राभिषेक, विशेष पूजा व आरती विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले. पहाटेच्या मंगळ आरतीपासून मध्यरात्रीच्या महाआरतीपर्यंत भाविकांची सतत ये-जा सुरू होती. उपवास, जप-नामस्मरण, भजन-कीर्तनातून भक्तांनी शिवभक्तीचा अनुभव घेतला.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर ट्रस्ट व स्वयंसेवकांनी दर्शन रांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्राथमिक उपचार, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था केली. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आली. प्रसाद वितरण व धार्मिक साहित्याचे स्टॉल भाविकांचे आकर्षण ठरले. नवी मुंबईसह शेजारील परिसरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसर दिवसभर गजबजलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com