औद्योगिक क्षेत्रात कचरा व्यवस्थापन ढासळले

औद्योगिक क्षेत्रात कचरा व्यवस्थापन ढासळले

Published on

औद्योगिक क्षेत्रात कचरा व्यवस्थापन ढासळले
रस्त्यांच्या कडेला साचलेल्या ढिगाऱ्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न

बोईसर, ता. १६ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. येथील अनेक रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याचे ढीग साचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आपत्कालीन व सेवा मार्ग म्हणून विकसित करण्यात आलेले रस्ते आता एकप्रकारे ‘डम्पिंग झोन’ बनल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगार व नागरिकांतून उमटत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेले हे अंतर्गत रस्ते औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. मात्र, पीडीटीएस ग्राउंड परिसरासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलेला घनकचरा थेट रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचे दिसून येत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, काही रस्त्यांवर गेट बसविण्यात आले असले तरी अनेक गेट सतत उघडी असल्याने रात्रीच्या अंधारात कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. नेमका हा कचरा कोणाकडून टाकला जात आहे, याबाबत प्रशासनाकडे ठोस माहिती नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या गप्पा रंगत असताना स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशासन तातडीने पावले उचलणार की परिस्थिती आणखी बिकट होण्याची वाट पाहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
------------
चौकट
औद्योगिक क्षेत्रात रासायनिक व इतर संवेदनशील उद्योग कार्यरत असताना अशा प्रकारे कचरा साचणे हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही धोक्याचे मानले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत या मार्गांचा वापर अडथळाग्रस्त झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून कचरा हटवावा, अंतर्गत रस्त्यांवरील गेट कायमस्वरूपी बंद ठेवावीत आणि अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com