पोशीर–शिलार धरणांच्या कामाला अखेर गती
पोशीर, शिलार धरणांच्या कामाला गती
जलसंपदा विभागाकडून कंत्राटदारांना कार्यादेश जारी; एमएमआर क्षेत्राची तहान भागणार
बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : मुंबई महानगर क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पोशीर आणि शिलार या दोन महत्त्वाकांक्षी धरणांच्या कामाला अखेर प्रशासकीय गती मिळाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने या दोन्ही प्रकल्पांच्या उभारणीसाठी कंत्राटदारांना कार्यादेश जारी केले असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
मुंबईसह बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत असलेले जलस्रोत अपुरे पडत असल्याने नवी धरणे उभारणे अनिवार्य झाले होते. बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीवर थेट धरण बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने उल्हास नदीच्या उपनद्यांवर धरणे बांधण्याचा निर्णय घेतला. या उपनद्यांच्या परिसरात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. दरम्यान, साठवणूक व्यवस्था नसल्याने हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हीच गरज ओळखून शिलार व पोशीर नद्यांवर प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांची जबाबदारी दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडे सोपवण्यात आली आहे. पोशीर धरणाची उभारणी २,१३५ कोटी ९७ लाख रुपये खर्चून प्रसाद एचईएस बेकेम या कंपनीमार्फत केली जाईल. यातून तब्बल १२.३४ टीएमसी इतका विशाल पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच शिलार धरणाचे काम १,६६७ कोटी ६५ लाख रुपये खर्चातून महालक्ष्मी एसईएल ही कंपनी पूर्ण करेल. या प्रकल्पातून ६.६१ टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या निविदेतील अटींनुसार धरण उभारणीसह सांडवा प्रणाली, पाणीपुरवठा व्यवस्था आणि विद्युत उपकरणांची कामे येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
पूरनियंत्रण आणि टंचाईवर मात
बदलापूर आणि आसपासच्या परिसराला पावसाळ्यात उल्हास नदीच्या पुराचा मोठा फटका बसतो. या उपनद्यांवर धरणे झाल्यामुळे पावसाळ्यात प्रवाहाचा वेग नियंत्रित करणे सोपे जाईल. त्यामुळे पूरस्थितीची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. तसेच उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई या साठवलेल्या पाण्यामुळे कायमस्वरूपी दूर होईल.
भूसंपादनाचे मोठे आव्हान
प्रकल्पाला गती मिळाली असली तरी वनजमिनीचे हस्तांतरण आणि खासगी जमिनीचे भूसंपादन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जर भूसंपादनात अडथळे आले तर प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी शिलार व पोशीर ही धरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. गेल्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश मिळत आहे. महायुती सरकारने कार्यादेश जारी केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या प्रकल्पांमुळे भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
- राम पातकर, माजी नगराध्यक्ष, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

