रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी महापौरांकडे धाव
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसाठी महापौरांकडे धाव
संघटनांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी
टिटवाळा, ता. १६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या समस्यांनी प्रवाशांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना’ आणि उपनगर रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून सर्व स्थानक परिसर लवकरच फेरीवालामुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
संख्येने मोठ्या असलेल्या रेल्वे प्रवाशांच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी समस्यांचा पाढा वाचला. डोंबिवली, कल्याण, शहाड, आंबिवली आणि टिटवाळा स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा आणि बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रेल्वे रुळांलगतच्या वस्त्यांमधील सांडपाणी आणि कचरा पावसाळ्यात थेट रुळांवर येतो, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित होते. स्कायवॉक आणि स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी वाढलेले अनैतिक व्यवसाय व वाढती असुरक्षितता, ज्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आंबिवली येथील रेल्वे अंडरपासची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. हे मुद्दे बैठकीत प्रामुख्याने मांडण्यात आले.
प्रशासकीय समन्वयाची मागणी
रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने गुन्हेगारांचे फावते आहे. यावर तोडगा म्हणून संघटनेचे अध्यक्ष राजेश घणगाव यांनी शहर पोलीस आयुक्त, रेल्वे पोलीस आयुक्त आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करावे, असे त्यांनी सुचवले.
महापौरांचे आश्वासन
शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. "रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल. फेरीवाल्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल," असे आश्वासन महापौरांनी दिले. याप्रसंगी संघटनेच्या वतीने महापौरांना भारतीय संविधान भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच संघटनेच्या ‘दिनदर्शिका २०२६’चे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीत विशाल जाधव, आरती भोईर, अनंता ढोणे, कांचन कुलकर्णी, रमण तरे आणि चंद्रकांत वाघचौरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

