जल व्यवस्थापनावर नवी मुंबई महापालिकेचे सादरीकरण
वाशी, ता. १६ (बातमीदार) : पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देणारी एन्व्हायरोटेक परिषद वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडली. यामध्ये केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध महापालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी, तसेच औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, सल्लागार आणि धोरणकर्ते उपस्थित होते. या परिषदेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता स्वप्नील देसाई यांनी ‘प्रक्रियाकृत सांडपाणी भविष्यातील जलस्रोत’ या विषयावर सादरीकरण केले.
भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल व माहितीपूर्ण सादरीकरणामध्ये त्यांनी भविष्यातील वाढती पाणीटंचाई, जलस्रोतांवरील वाढता ताण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी हे पर्यायी व शाश्वत जलस्रोत म्हणून कसे विकसित करता येईल, याबाबत मांडणी केली. आधुनिक सांडपाणी उपचार तंत्रज्ञान, तृतीय व चतुर्थ स्तर उपचार, उदयास येणारे प्रदूषक आणि त्यांचे संभाव्य धोके, तसेच त्यावरील नियंत्रण व उपाय यावर त्यांनी विशेष भाष्य केले. यासोबतच महापालिकेच्या स्तरावर करता येणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना व धोरणात्मक दृष्टिकोन यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
या परिषदेचे उद्घाटन उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन यांच्या हस्ते झाले. त्यांनी पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासन, उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

