

पाणीटंचाईवर अखेर मात
अर्थसंकल्पात निधीची तरतूद, महापौरांचे आश्वासन
विरार, ता. १७ (बातमीदार)ः वसईच्या पूर्व पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडवण्याचे महापौर अजीव पाटील यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे गेली ११ वर्षे पालिकेला २५ स्मरणपत्रे पाठवून लढा देणाऱ्या माजी नगरसेविकेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
महापालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २७ परिसरातील कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, सातिवली (गिदराईपाडा) या परिसरात दरवर्षी जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. जसजसा उन्हाळा वाढत जातो, या परिसरातील पाणीप्रश्न भीषण रूप धारण करते. या परिसरात आदिवासी समाज, गरीब मजूरवर्ग मोठ्या संख्येने राहतात. दररोज कमवायचे आणि खायचे, असा त्यांचा दिनक्रम असतो. कधी-कधी तर काम मिळाले नाही, तर उपासमारीची वेळ येते. अशा बिकट परिस्थितीत जगण्यासाठी दररोज पाणी विकत घेण्याची किंवा पाण्यासाठी दिवसभर वणवण भटकावे लागते. या टंचाईच्या काळात आदिवासींना कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात खड्डे खणून दूषित पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत होते.
--------------------------------
पालिकेला २५ स्मरणपत्रे
या गावांमध्ये नवीन हातपंप त्वरित मारावे, विहिरींची स्वच्छता करुन टँकरने पाणीपुरवठा करावा, कामण गावातील नादुरुस्त असलेली लघु पाटबंधारे योजना, दलित वस्तीची पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशा मागण्या तत्कालीन नगरसेविका प्रीती म्हात्रे, दिनेश म्हात्रे यांनी केल्या आहेत.या मागण्यांसाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये पहिले निवदेन महापालिकेला दिले होते. त्यानंतर गेल्या ११ वर्षांत २५ स्मरणपत्रे पालिकेला दिली आहेत. तरीही पालिकेने पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
=====================================
या ठिकाणचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तसेच विहिरीतील गाळ साफ करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय काही ठिकाणांवर कूपनलिका सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.