शहिदी समागमानिमित्त उल्हासनगर महापालिकेची तयारी
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत भव्य आणि बहुआयामी कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने तयारीला वेग देत जनजागृती आणि समन्वयासाठी तातडीची आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्देशांनुसार, उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी १६ फेब्रुवारीला सर्व संबंधित विभागप्रमुखांची विशेष बैठक बोलावली. शिक्षण, परिवहन, क्रीडा, जनसंपर्क, वैद्यकीय आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, भांडार व मालमत्ता कर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी शहरस्तरावर युद्धपातळीवर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. उल्हासनगरमध्ये शीख समाजाची लक्षणीय उपस्थिती लक्षात घेऊन खारघर येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी विशेष परिवहन बस सेवेची व्यवस्था करण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. भाविकांना सोयीस्कर प्रवास उपलब्ध व्हावा, यासाठी नियोजनबद्ध वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर योग्य समन्वय राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बैठकीला उपायुक्त स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त अजय साबळे, गणेश शिंपी, नीलम कदम, विनोद केणी यांच्यासह अनेक विभागप्रमुख उपस्थित होते. शीख इतिहासातील हा प्रेरणादायी पर्व अधिकाधिक जनसहभागातून यशस्वी व्हावा, यासाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बलिदानाची प्रेरणा जागविणार
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या घंटागाड्यांद्वारे, तसेच परिवहन बसमधून कार्यक्रमाविषयी माहितीपर ऑडिओ क्लिप्स प्रसारित केल्या जाणार आहेत. शहरातील चित्रपटगृहांमध्ये गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट आणि प्रेरणादायी गीते प्रदर्शित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शालेय स्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गुरुंच्या बलिदानाची प्रेरणा जागविण्यात येणार आहे. जनसंपर्क विभागाद्वारे सर्व चित्रपटगृहांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

