पालिकेत आव्हाड–मुल्ला आमनेसामने; संवाद टाळला

पालिकेत आव्हाड–मुल्ला आमनेसामने; संवाद टाळला

Published on

पालिकेत आव्हाड-मुल्ला आमनेसामने; संवाद टाळला
विरोधी पक्षनेतेपदाबाबत दोघांचीही ‘घाई नको’ भूमिका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी (ता. १६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेते एकाच वेळी उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला हे दोघे महापालिकेत आले होते. मात्र, प्रत्यक्ष समोरासमोर येऊनही त्यांनी संवाद टाळल्याचे दिसून आले.
सोमवारी दुपारी आव्हाड हे महापालिकेत कामानिमित्त आले होते. त्याचवेळी मुल्ला हेही मुख्यालयात दाखल झाले. आव्हाड पत्रकारांशी संवाद साधत असताना काही अंतरावर मुल्ला कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत उभे होते. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप नाव जाहीर झालेले नाही. यासंदर्भात विचारले असता आव्हाड यांनी, महासभा २० फेब्रुवारीला होणार आहे. अजून वेळ आहे; घाई कशाला? अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, संवाद न झाल्याबाबत मुल्ला यांना विचारले असता, आव्हाड बाजूने गेले त्यांनी पाहिले नाही. मीही एका विषयात गुंतलो होतो. आमच्यात वैर नाही मात्र सध्या सहसा बोलणे होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काहीही होऊ शकते
विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. संख्याबळानुसार शरद पवार गट मोठा असला तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे ते म्हणाले. महासभेला अजून चार दिवस आहेत. ठाणे महापालिकेत चार मिनिटांतही घडामोडी घडू शकतात. २० फेब्रुवारीला सकाळी १०.५९ वाजेपर्यंत काहीही होऊ शकते, असा सूचक इशाराही मुल्ला यांनी दिला.

Marathi News Esakal
www.esakal.com