मेट्रो, रस्ते प्रकल्पांना चालना
मेट्रो, रस्ते प्रकल्पांना चालना
एमएमआरडीए अर्थसंकल्पात ४,८९७ कोटींची तरतूद
रिंग रोड, ऐरोली-काटई फ्री-वे प्रकल्पांना मिळणार गती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम करण्यासाठी गती मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिका विस्तार, उड्डाणपूल, रिंग रोड आणि महत्त्वाच्या द्रुतगती मार्गांसाठी तब्बल चार हजार ८९७.१० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामुळे परिसरातील अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना आता प्रत्यक्ष वेग येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मेट्रो व रस्ते प्रकल्पांसाठी एकूण चार हजार ८९७.१९ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि शहरांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन एमएमआरडीएने दीर्घकालीन नियोजनावर भर दिला आहे. विशेषतः पूर्व उपनगरे आणि आसपासच्या शहरांना सक्षम वाहतूक जाळ्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निधीतील मोठा हिस्सा मेट्रो जाळ्याच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे. यामध्ये मेट्रो-५ आणि मेट्रो-५अ विस्तारीकरण तसेच मेट्रो-१२ आणि मेट्रो-१४ या महत्त्वाच्या मार्गांच्या कामांना गती दिली जाईल. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली आणि आसपासचा परिसर थेट मुंबईतील प्रमुख व्यावसायिक आणि निवासी पट्ट्यांशी जोडला जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
उड्डाणपुलांचे जाळे भक्कम
केवळ मेट्रोच नव्हे, तर रस्ते विकास प्रकल्पांनाही या अर्थसंकल्पातून मोठा बूस्ट मिळाला आहे. कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, बहुप्रतीक्षित कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग आणि ऐरोली-काटई फ्री-वे (टप्पा-३) या प्रकल्पांमुळे शहरांतर्गत तसेच आंतरशहरी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. यामुळे केवळ नागरिकांचा प्रवासच सुखकर होणार नाही, तर मालवाहतूक आणि लॉजिस्टिक साखळीलाही मोठी गती मिळेल.
सर्वांगीण विकासाला चालना
गेल्या काही वर्षांत या परिसरात गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि औद्योगिक गुंतवणुकीचा विस्तार वेगाने झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आधुनिक पायाभूत सुविधांची गरज निर्माण झाली होती. नव्या निधीमुळे सुरू असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होईल आणि नियोजित नागरीकरणाला मोठी चालना मिळेल. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी आणि व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होणार आहे.
राज्य सरकारच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मोठे पाठबळ मिळत आहे. नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा अर्थसंकल्प या परिसराला स्वतंत्र शहरी ओळख देणारा ठरेल.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा
महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळालेला निधी
मेट्रो - ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) : १,३०९.३० कोटी
मेट्रो - ५ अ विस्तारीकरण (दुर्गाडी ते उल्हासनगर) : १८३.३५ कोटी
मेट्रो - १२ (कल्याण ते तळोजा) : १,०५४.५४ कोटी
मेट्रो - १४ (कांजूरमार्ग-बदलापूर) : ५०० कोटी
रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्प
ऐरोली-काटई फ्री वे (टप्पा-३) : ९०० कोटी
कल्याण रिंग रोड : ६०० कोटी
विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग : २०० कोटी
कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल : १५० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

