

नव्या रस्त्यालाच कचऱ्याचे ग्रहण
टिटवाळ्यात अमृतसिद्धी परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण
टिटवाळा, ता. १८ (वार्ताहर) : पूर्व भागातील अमृतसिद्धी सोसायटी परिसरात विकासाच्या नावाखाली रस्ते तर चकाचक झाले आहेत; मात्र कचरा व्यवस्थापनाच्या बोजवाऱ्यामुळे या नव्या रस्त्यांनाच आता कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. बैठ्या घरांकडून रस्त्यावरच ओला-सुका कचरा फेकला जात असल्याने परिसरात दुर्गंधीचा कहर पसरला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सोसायटीमधील रहिवासी नियमितपणे घंटागाडीत कचरा देतात; मात्र शेजारील बैठ्या घरांपर्यंत घंटागाडी पोहोचत नसल्याने तिथले नागरिक सर्रास रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. यामुळे नव्याने डांबरीकरण झालेला रस्ता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. स्थानिक रहिवासी अमिताभ सारंग यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, की पावसाळ्यात या कचऱ्यामुळे चिखल आणि सडलेल्या अन्नामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होते. उंदीर, घुशी आणि कुत्र्यांच्या उपद्रवामुळे येण्या-जाण्याचा रस्ता नरकप्राय झाला आहे. नवीन रस्ते झाले तरी कचऱ्याच्या समस्येमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना संसर्गजन्य आजारांची भीती वाटत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सुशोभीकरणाचा पर्याय
जागरूक नागरिक अॅड. जितेंद्र जोशी यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे यांच्याकडे पाठपुरावा करताना सांगितले, की स्वच्छता कर्मचारी कचरा उचलतात; पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे कचरा साचतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून कचराकुंडीच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, जेणेकरून तिथे कचरा टाकण्यास कुणी धजावणार नाही.
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
बैठ्या घरांपर्यंत नियमित घंटागाडी पोहोचवावी.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
परिसरात सीसीटीव्ही आणि सूचनाफलक लावावेत.
अ प्रभाग प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.