शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
खारघरमध्ये बोधी ब्लेंडेड लर्निंग, एएसएचा संयुक्त उपक्रम; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खारघर येथे बोधी ब्लेंडेड लर्निंग व आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पोवाडा, गायन तसेच रील्स मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शिवरायांचे विचार प्रभावीपणे मांडले. मी सावित्री, मी जिजाऊ, मी रमाई, मी अहिल्या, मी राणी लक्ष्मीबाई या वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थिनींनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे विचार जिवंत केले. अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली, तर दूरवरच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चौकट
तंत्रज्ञानामुळे वाढली राज्यभर व्याप्ती
या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाइन सहभागाची सुविधा. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळाली. इतिहास, स्वराज्य संकल्पना व सामाजिक न्याय या विषयांवर विद्यार्थ्यांनी सखोल मांडणी करीत आधुनिक तंत्रज्ञानातून शिवरायांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला. तरुणांना इतिहासाशी जोडणे हा मुख्य उद्देश आहे, असे संचालिका पायल कांबळे यांनी सांगितले.

