आठ जणांना तत्काळ नागरिकत्व

आठ जणांना तत्काळ नागरिकत्व

Published on

आठ जणांना तत्काळ भारतीय नागरिकत्व
सिंधी बांधवांना मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांशी आता ‘थेट संवाद’, प्रलंबित प्रकरणांसाठी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विशेष भेट

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत अनेक वर्षांपासून अडकलेल्या सिंधी समाजातील कुटुंबांसाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आठ जणांना तत्काळ नागरिकत्व बहाल करण्यात आले असून, उर्वरित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता ‘थेट भेटी’ची ऐतिहासिक घोषणा केली आहे.

मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार कुमार आयलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी नागरिकत्वासाठी सर्व निकष पूर्ण केलेल्या आठ अर्जदारांना तत्काळ नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षानुवर्षांचा संघर्ष संपल्याने या नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

नागरिकत्व प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता करताना होणारा विलंब टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता ज्या नागरिकांची प्रकरणे प्रलंबित आहेत, ते दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकणार आहेत. यामुळे दलाल किंवा मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

प्रशासनाची तत्परता
बैठकीला उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मादेखील उपस्थित होते. ज्या नागरिकांनी नागरिकत्वाची शपथ घेतली आहे, पण प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा प्रकरणांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकत्व हा केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
आठ नागरिकांना तत्काळ भारतीय नागरिकत्व जाहीर
दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा.
प्रलंबित फाइल्सचा जलद गतीने निपटारा करण्याचे प्रशासनाचे आदेश.
मध्यस्थांना चाप, नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com