जव्हारच्या कलाकारांची सिन्नरमध्ये दमदार हजेरी

जव्हारच्या कलाकारांची सिन्नरमध्ये दमदार हजेरी

Published on

आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; जव्हारच्या कलाकारांचे सिन्नरमध्ये दमदार सादरीकरण

जव्हार, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित दोनदिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात जव्हार तालुक्यातील लोककलाकारांनी सिन्नरमध्ये दमदार सादरीकरण करत, आपल्या परंपरेचा अभिमानाने जागर केला.
सिन्नर येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहमधील महाकवी वामनदादा कर्डक रंगमंच येथे या महोत्सवाची सुरुवात झाली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी परंपरेतील ढाक वादन आणि पारंपरिक गायनाने वातावरण भारावून गेले. मोहन दखणे यांच्यासह पंडित किनर, सोमा किनर, भाऊ बांबरे, महादू दखणे, शंकर भोरे, धाकल किनर आदी कलाकारांनी आदिवासी देव-देवतांना, निसर्गदेवतेला व कनसरी मातेला वंदन करत सादरीकरणास प्रारंभ केला. या वेळी सुरेल स्वर आणि ढोल-ताशांच्या निनादाने सभागृह दुमदुमून गेले.
बोहाड्याच्या सादरीकरणात नरसिंह आणि महिसासूर यासारख्या देव-दैवतांचे मुखवटे धारण करून कलाकारांनी लोकपरंपरेचे जिवंत दर्शन घडवले. रंगमंचावरील देखावे, आकर्षक वेशभूषा आणि जोशपूर्ण अभिनयामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या महोत्सवाचे नियोजन ॲड. संजय रानडा आणि राजन वैद्य यांनी केले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात आपटाळे गावातील लोककलाकारांचा लक्षणीय सहभाग राहिला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सिन्नरमध्ये आदिवासी संस्कृतीचा उत्सव अक्षरशः रंगला असून, जव्हारच्या कलावंतांनी आपल्या परंपरेचा ठसा उमटवला आहे.
---------------
चौकट
तारपा नृत्याने मने जिंकली
रुईचामाथा येथील आदिवासी महिला कलाकारांनी सादर केलेल्या तारपा नृत्याने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. एकात्मता आणि सामूहिकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या नृत्यातून आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते प्रभावीपणे अधोरेखित झाले. तारपा वादनाचे सांस्कृतिक महत्त्वही या वेळी उलगडून सांगण्यात आले. आपटाळे येथील ढोल पथकानेही जोशपूर्ण सादरीकरण करत महोत्सवाची रंगत वाढवली. महादू सोरे, सोमा किनर, भाऊ बांबरे, मोहन देखणे, विलास किनर, संजय किनर, ढवळ भोरे, पंडित किनर, शंकर बांबरे, ढवळ किनर, रमेश किनर आदी कलाकारांनी ढोलवादन आणि पारंपरिक नृत्याच्या तालावर उपस्थितांची मने जिंकली.

जव्हार : सिन्नर येथे जव्हारमधील आदिवासी परंपरा तथा संस्कृती सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com