खरोंडा गावात सापडले पुरातन मंदिराचे अवशेष
जव्हार, ता. १८ (बातमीदार) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार तालुक्यातील पिंपळशेत - खरोंडा ग्रामपंचायतीतील खरोंडा गावठाण येथे प्राचीन शिवपिंड व मंदिराचे भग्नावशेष आढळले आहेत. परिसरात सापडलेले मंदिराचे भग्नावशेष, महादेवाची भग्न पिंड व नंदी मूर्ती ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. या ठेव्याचे संवर्धन व शास्त्रोक्त अभ्यास व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
अनेक पिढ्यांपासून अस्तित्वात असलेली ही शिवपिंड प्राचीन असल्याचे स्थानिक जाणकार सांगतात; मात्र तिचे नेमके वय अद्याप निश्चित झालेले नाही. पूर्वी रामू हांडवा व देऊ हांडवा हे गावदेव मंदिरात पूजा-अर्चा करीत होते. त्यांच्या पश्चात विष्णू हांडवा व गुलाब हांडवा हे भक्तिभावाने पूजा विधी पार पाडत आहेत. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना पिंडीतील दगड हाताने उचलण्याची परंपरा आहे. काम यशस्वी होणार असल्यास दगड सहज उचलला जातो अन्यथा तो उचलला जात नाही, अशी श्रद्धा अनेक वर्षांपासून जपली आहे.
यंदा प्रथमच सरपंच दिनेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हुंबरन, माडवीहरा, सिंगारपाडा, हेदीचापाडा, पिंपळशेत व खरोंडा गावठाण येथील ग्रामस्थ एकत्र येऊन महाशिवरात्रीचा सामूहिक उत्सव साजरा करण्यात आला. पेसा अध्यक्ष रमेश हांडवा यांच्या पुढाकाराने उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.
इतिहासात विविध आक्रमणांच्या काळात देवगिरी किल्ला, पंढरपूर मंदिर आणि तुळजापूर मंदिर यांसारख्या स्थळांनाही फटका बसल्याची उदाहरणे आहेत. कालांतराने स्थानिक सत्तांनी व जनतेने त्यांचा जीर्णोद्धार केला. खरोंडा येथील या पुरातन वास्तूचेही जतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खरोंडा गावठाण येथील ही वास्तू जुनी आहे. उद्ध्वस्त स्थितीत असली, तरी तिचा शोध लागणे, ही मोठी उपलब्धी आहे. आपल्या पूर्वजांच्या पुरातन वारशाची ही महत्त्वाची पाऊलखूण आहे. अशा प्राचीन देवालयांचा जीर्णोद्धार राज्य पुरातत्त्व खात्याने करणे आवश्यक आहे.
- राम खुर्दळ, दुर्ग इतिहास अभ्यासक, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

