मालवणीतील मैदानात खुलेआम मद्यपान
मालवणीतील मैदानात खुलेआम मद्यपान
मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन
नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना, तातडीच्या कारवाईची मागणी
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक ८ येथील म्हाडाच्या मालकीचे पतंगवाला मैदान सध्या ‘खुले मद्यालय’ बनल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दररोज संध्याकाळनंतर या मैदानात मद्यप्राशन आणि अमली पदार्थांचे सेवन खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही तरुण दुचाकीवर क्वार्टर, बीअर व चकणा घेऊन मैदानात येतात. कागद अंथरून खुलेआम मद्यपान केले जाते. हे प्रकार संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. याच काळात काही जणांकडून चरस व इतर अमली पदार्थांचे सेवनही निर्धास्तपणे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. अनेकदा मद्यधुंद अवस्थेत भांडणे व हाणामारीच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दारूच्या बाटल्या मैदान, रस्त्यावर फेकल्या जातात. बाटल्यांच्या काचांमुळे येथे खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या पायाला जखमा झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मद्यधुंद अवस्थेत काही जण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढतात, आरडाओरडा करून धिंगाणा घालतात, अशीही तक्रार आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर महिलांना व कुटुंबीयांना बाहेर पडणे असुरक्षित वाटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात अनेक सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
मैदानात खुलेआम मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, मुलींची छेडछाड आणि हाणामाऱ्या सुरू असताना पोलिस प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रकारांकडे का जात नाही, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तातडीने कारवाई करा
मालवणी आणि म्हाडा परिसरातील अनेक मोकळ्या आरक्षित भूखंडांवर सध्या ‘ओपन बार’ सुरू असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवस-रात्र खुलेआम नशा केली जाते. संध्याकाळी शेकडो लोकांच्या दारू पार्ट्या रंगतात. पोलिस व संबंधित यंत्रणांना माहिती असूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कुटुंबीयांसह बाहेर पडणे धोकादायक वाटू लागले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी, अशी मागणी कार्यकर्ते गणेश क्षीरसागर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

