कळंबोलीचे मैदान नूतनीकरण करून नि:शुल्क ठेवावे
कळंबोलीचे मैदान नूतनीकरण करून नि:शुल्क ठेवावे
नगरसेवक विजय खानावकर यांची महापौरांकडे मागणी
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : कळंबोली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्याची मागणी नगरसेवक विजय खानावकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे केली आहे. क्रीडांगण नूतनीकरणाच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर विजय खानावकर यांनी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत कळंबोलीमधील खेळाडू व नागरिक उपस्थित होते. क्रीडांगणाचे नूतनीकरण ही अत्यंत स्वागतार्ह व सकारात्मक बाब असली तरी त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे.
क्रीडांगणाच्या परिसरात कळंबोली गावासह कष्टकरी माथाडी कामगार, हातमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे मैदानाच्या वापरासाठी शुल्क आकारल्यास अनेक मुलांना खेळापासून वंचित राहावे लागू शकते. खेळ हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे माध्यम असून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलाचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हीच अपेक्षा असल्याचे खानावकर यांनी सांगितले आहे.
व्यावसायिक वापर टाळावा
क्रीडांगणाचा व्यावसायिक हेतूने वापर टाळून ते सार्वजनिक स्वरूपातच उपलब्ध ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. येथे आयोजित विविध क्रीडा स्पर्धा, क्रिकेट सामने किंवा इतर उपक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. मैदान हे केवळ खेळासाठीच नव्हे, तर परिसरातील युवकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन खानावकर यांनी केले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही या भूमिकेचे स्वागत करत मैदान सर्वांसाठी खुले आणि मोफत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

