२०२५ या वर्षभरात २७८ जणांचा ठाणे रेल्वे हद्दीत मृत्यू

२०२५ या वर्षभरात २७८ जणांचा ठाणे रेल्वे हद्दीत मृत्यू

Published on

‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा
२०२५ या वर्षभरात २७८ जणांचा ठाणे रेल्वे हद्दीत मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांच्या मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात विविध रेल्वे अपघातांत तब्बल २७८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये २०२५ वर्षातील सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले असून, नियमांचे उल्लंघन प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत, तर दुसरीकडे धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचा आकडा ६६ असल्याची बाब रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवरून पुढे आलेली आहे.
ठाणे हे वर्दळ आणि गर्दीचे स्थानक म्हणून मध्य रेल्वेवरील पहिल्या पाचमधील दुसऱ्या क्रमांकावर येते. त्यातच हे स्थानक ठाणे लोहमार्ग (रेल्वे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. लोहमार्ग पोलिसांची हद्द ही ठाण्यापासून, दिघा, दिवा आणि दिव्यापासून थेट कळंबोली रेल्वे स्थानकापर्यंत पसरलेली आहे. त्यातच ठाणे रेल्वे स्थानकावर मध्य-हार्बर आणि मेल एक्स्प्रेसचा मोठा भार असतो. तसेच दिवा हे जंक्शन असले तरी येथून लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची वाहतूक सुरू असल्याने तेथे गर्दी असते. याशिवाय कळवा आणि मुंब्रा या स्थानकातील गर्दी ही ठाणे आणि दिवा स्थानकांपेक्षा निम्मी आहे. या वाढत्या गर्दीत अनेक जण शॉर्टकटने रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात १४४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे, तर धावत्या लोकलमधून पडून किंवा लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पादचारी पूल, भुयारी मार्ग आणि अधिकृत मार्ग उपलब्ध असतानाही प्रवासी शॉर्टकट वापरत असल्याने अपघातात वाढ होत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे, तर रेल्वे परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि रूळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

रेल्वे अपघाती तक्ता
प्रकार पुरुष महिला एकूण
रूळ ओलांडणे १२५ १९ १४४
लोकलमधून पडून ६० ६ ६६
फलाट गॅप १ १ २
इलेक्ट्रिक शॉक ३ ०० ३
सुसाईड ४ ०० ४
नैसर्गिक मृत्यू ५४ ०५ ५९
एकूण २४७ ३१ २७८

महिला मृत्यूंची वाढती चिंता
एकूण मृत्यूंपैकी ३१ महिला प्रवाशांचा मृत्यू झाल्याने महिलांच्या रेल्वे सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवरील धक्काबुक्की आणि धावत्या गाडीत चढण्याचे प्रकार यामागील कारणे असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com