गरीबांच्या जीवाला घोर

गरीबांच्या जीवाला घोर

Published on

गरिबांच्या जीवाला घोर
डायल १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटरवर’
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १८ ः अपघात, हृदयविकार अथवा इतर आपात्कालीन वैद्यकीय परिस्थितीत गरजूंना मोफत रुग्णवाहिनी सेवा मिळावी याकरिता डायल १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील हीच सेवा आत व्हेंटिलेटरवर पोहोचली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. रुग्णवाहिकेत डॉक्टर नसणे, व्हेंटिलेटर बंद असणे, रुग्णावाहिकेची फिटनेस संपल्याने सतत बिघाड होणे, अशा संकटात ही सेवा सापडल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ लागला आहे.
भारत सरकारने देशभरातील गंभीर अवस्थेतील रुग्णांना काही मिनिटातच रुग्णालयात पोहोचून वेळेत उपचार मिळावेत याकरिता डायल १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये सुरू केलेल्या या सेवेला यंदा १२ वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु देवदूतासारखी धावून येणारी डायल १०८ रुग्णवाहिका सेवा आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. रुग्णवाहिनींवरील वाहतुकीचा ताण, दुरुस्ती कामी होणारे दुर्लक्ष, रस्त्यांवरील खड्डे आणि रुग्णवाहिकांचे आयुर्मान संपत आल्याने ही व्यवस्थाच कोलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या उपक्रमातंर्गत ठाणे जिल्ह्याकरिता देण्यात आलेल्या बहुतांश रुग्णवाहिका धावण्यास अकार्यक्षम झाल्या आहेत. त्यांच्यात झालेल्या बिघडाची वेळेत दुरुस्त झाली नसल्याने रुग्णवाहिकेचे दरवाजे जाम होणे, स्ट्रेचर बाहेर न येणे, स्टेफणी ठेवण्यासाठी जागा नसणे, अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
मंगळवारी (ता. १७) या वाहिनीतून शहापूर येथून गंभीर आजाराचा रुग्ण ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणला असता रुग्ण वाहिकेचा दरवाजा जाम झाल्याने उघडत नव्हता. तसेच स्ट्रेचरदेखील नादुरुस्त असल्याने काढता येत नव्हते. शिवाय स्टेफणी (अतिरिक्त टायर) रुग्णाच्या शेजारी ठेवण्यात आली होते. या प्रकरावर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, भारत सरकारने आपत्कालीन मदतीसाठी सुरू केलेली ही सेवा ठाणे जिल्ह्यात केवळ कागदावर उरली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

चालकांचे गाऱ्हाणे
टायर लावणारी जागा तुटल्यामुळे टायर रुग्णाच्या शेजारी ठेवावे लागत आहे. रुग्णवाहिनीची अवस्था दयनीय असून, मोठ्या कौशल्याने ती चालवावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण वाहून नेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका नादुरुस्त असून, ती अनेक दिवसांपासून गॅरेजला असल्याचेही त्या चालकाने सांगितले.

१०८ रुग्णावाहिकेच्या ३९ गाड्या
ठाणे जिल्ह्यातील डायल १०८ रुग्णावाहिका ३९ गाड्या असून, २६ जानेवारी २०१४ पासून कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकांनी जानेवारी २०२६ पर्यंत तीन लाख ८७ हजार ४२१ रुग्णांना आपत्कालीन सेवा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com