स्कूल बस-व्हॅनचालकांची अल्कोहोल चाचणी
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नाही, असा संदेश देत उल्हासनगर शहर वाहतूक विभागाने शाळा बस आणि व्हॅनचालकांवर बुधवारी (ता. १८) धडक तपासणी मोहीम राबवली. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि चालकांची अल्कोहोल चाचणी करत वाहतूक पोलिसांनी सजगतेचे उदाहरण घालून दिले आहे.
उल्हासनगर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शहर वाहतूक विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शाळा बस आणि व्हॅनची कागदपत्रे, वाहनांची तांत्रिक स्थिती, फिटनेस सर्टिफिकेट, विमा, परवाना यांची तपासणी करण्यात आली. तसेच वाहनचालकांची अल्कोहोल चाचणी करून ते मद्यप्राशन करून वाहन चालवत नाहीत ना, याची खात्री करण्यात आली.
वाहतूक विभागाच्या या अचानक तपासणीमुळे अनेक वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली. काही वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या, तर किरकोळ त्रुटी आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कोणतीही बाब सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी दिला.
या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ काळे, संतोष भोईर, संजय बेंद्रे, जितेंद्र चित्ते, मनोज काळे, नाना आव्हाड, भारत खांडेकर आणि रणजीत खोत यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरातील शाळांच्या परिसरात आणि प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत यापुढेही अशा तपासण्या नियमितपणे केल्या जातील, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा बस आणि व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव सुरक्षित राहावा, यासाठी नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणे किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवासी वाहतूक करणे अजिबात सहन केले जाणार नाही. वाहतूक विभागाकडून अशा तपासण्या नियमितपणे केल्या जातील आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पालकांनीही जागरूक राहून सुरक्षिततेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन करतो.
- राजेश शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
उल्हासनगर : शाळा बस, व्हॅनचालकांची अल्कोहोल चाचणी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

