तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनधिकृत शेड

तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनधिकृत शेड

Published on

अनधिकृत शेडचे बांधकाम
तारापूर औद्योगिक क्षेत्रात

बोईसर, ता. १९ (वार्ताहर) : औद्योगिकदृष्ट्या राज्यातील महत्त्वाच्या पट्ट्यांपैकी एक असलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत अनधिकृत शेड उभारणीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या प्लॅस्टिक शेड या कायम ठेवण्याच्या प्रकारामुळे आपत्कालीन मार्ग अरुंद झाले असून, संभाव्य अपघातांवेळी मदतकार्यासाठी अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या अखत्यारीतील या विस्तीर्ण औद्योगिक क्षेत्रात सुमारे २१०० भूखंड असून, त्यापैकी १८०० औद्योगिक आणि ३०० निवासी आहेत. परिसरात १२०० हून अधिक लघु, मध्यम व मोठे कारखाने तसेच गोदामे कार्यरत असून, केमिकल, फार्मासिटिकल, कापड, अभियांत्रिकी व लोखंड प्रक्रिया उद्योगांचा मोठा विस्तार येथे झाला आहे. हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा औद्योगिक पट्टा राज्याच्या अर्थचक्रासाठी महत्त्वाचा मानला जातो, मात्र विविध आणि संवेदनशील उद्योग एकत्र कार्यरत असताना सुरक्षेच्या नियमांचे पालन अत्यावश्यक असून, काही ठिकाणी परवानगीविना कायमस्वरूपी शेड उभारल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या बांधकामांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका किंवा सुरक्षा पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले मोकळे मार्ग अडथळ्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
--------------
सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी गरजेची

औद्योगिक आणि निवासी भूखंडांची एकत्रित रचना लक्षात घेता येथे आग, स्फोट किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत व्यापक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नियमित तपासणी, अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई, तसेच आपत्कालीन मार्ग कायम मोकळे ठेवण्याची मागणी कामगार आणि नागरिकांकडून होत आहे. उद्योगांची वाढती संख्या आणि संवेदनशील उत्पादन प्रक्रिया लक्षात घेता सुरक्षाव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी हीच काळाची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


चौकट : तारापूर औद्योगिक पट्टा – आकडेवारीतून चित्र स्पष्ट

@ एकूण भूखंड : २१०० (१८०० औद्योगिक, ३०० निवासी)

@ कार्यरत उद्योग : १२०० हून अधिक कारखाने व गोदामे

@ प्रमुख क्षेत्रे : केमिकल, फार्मासिटिकल, कापड, लोखंड प्रक्रिया आदी

@ मुद्दा : पावसाळ्यानंतरही कायम असलेली प्लॅस्टिक/अनधिकृत शेड

@ धोका : आपत्कालीन मार्ग अडथळीत; दुर्घटनेवेळी बचावकार्यात अडचणी

@ मागणी : नियमित तपासणी व कडक सुरक्षा व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com