गंजाड येथे ‘मातीच्या रंगांचे संमेलना’ची जोरदार तयारी

गंजाड येथे ‘मातीच्या रंगांचे संमेलना’ची जोरदार तयारी
Published on

कासा, ता, १९ (बातमीदार) : आदिवासी वारली चित्रकलेतील दिग्गज, पद्मश्री जिवा सोमा म्हसे यांच्या जन्मगावी गंजाड येथे होणाऱ्या ‘मातीच्या रंगांचे संमेलना’ची तयारी जोरात सुरू आहे. निसर्गसंपन्न मातीत रुजलेल्या आदिम संस्कृती, वारली चित्रकला व लोककलांचा सुगंध आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर दरवळणार आहे. या पार्श्वभूमीवर २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान डहाणू तालुक्यातील गंजाड येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि राज्य पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमूर्त सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राबविला जात आहे.

सध्या गंजाड येथे कै. म्हसे यांचे शिष्य सदाशिव म्हसे, बाळू म्हसे, राजेश वांगड, अनील वांगड आदी स्थानिक वारली चित्रकार संमेलनाच्या पूर्वतयारीत व्यग्र आहेत. या संमेलनात स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग असणार असून, वारली चित्रांचे प्रदर्शन, आजूबाजूच्या गावांतील कलाकारांसाठी स्वतंत्र प्रदर्शन जागा, तसेच वारली संस्कृती दर्शविणाऱ्या कलाकृतींची निर्मिती सुरू आहे. बांबूची झोपडी उभारणीसह जुन्या पारंपरिक वस्तू नांगर, बैलगाडी, टोपल्या, कनगा, सूप, मुसळ, पाटा, वरवंटा आदींचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

डहाणू परिसरातील आदिवासी खाद्यपदार्थ व हस्तनिर्मित वस्तूंचे स्टॉल्सही आकर्षण ठरणार आहेत. या सांस्कृतिक महोत्सवामागील प्रमुख उद्देश म्हणजे येथील पारंपरिक जीवनशैलीचे अर्थपूर्ण जतन करणे व ग्रामीण पर्यटनाला चालना देणे. तसेच कला, हस्तकला कौशल्यविकास व कथाकथन प्रशिक्षणांमुळे स्थानिक कलाकार आज आपल्या संस्कृतीचे प्रभावी दूत बनले आहेत. गंजाड येथे जागतिक ख्यातीची वारली चित्रकलेची परंपरा प्रत्यक्ष पाहण्यास मिळणार असून, कारागिरांकडून वारली कला शिकण्याची दुर्मिळ संधीही पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाला पालघर जिल्हाधिकारी, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी भेट देणार आहेत.

परंपरा सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न
याबाबत बोलताना कै. म्हसे यांचे पुत्र सदाशिव म्हसे म्हणाले, आमच्या वडिलांनी वारली आदिवासी कलेच्या माध्यमातून येथील संस्कृती, राहणीमान व खाद्यपरंपरा सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तोच वारसा पुढे नेत, गंजाड येथील संमेलनातून ही कला पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com