हिंद-दी-चादर कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम

हिंद-दी-चादर कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम

Published on

हिंद-दी-चादर कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम

वसई, ता. २१ (बातमीदार) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्चला खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य हिंद-दी-चादर या कार्यक्रमाच्या जनजागृतीच्या अनुषंगाने वसई-विरार शहर महापालिकेमार्फत दररोज विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासंदर्भात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नुकतेच एका बैठकीनंतर याबाबत माहिती दिली आहे.
महापालिकेच्या मुख्यालय येथे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या उपस्थितीत वसई येथील श्री गुरू सिंग सभा गुरुद्वारा येथील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. श्री गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीतर्फे या बैठकीला समिती सचिव परमिंदर सिंग चढ्ढा, उपाध्यक्ष करणजित सिंग छाब्रा, समिती सदस्य सोनू चढ्ढा व ए. एस. आनंद उपस्थित होते. या वेळी महापालिकेमार्फत ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. तसेच खारघर, नवी मुंबई येथे मुख्य कार्यक्रमासाठी महापालिका क्षेत्रातील जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाच्या सुविधांबाबत करावयाच्या उपाययोजना चर्चा या वेळी करण्यात आली. गुरुद्वारा समितीतर्फे त्यांच्या स्तरावरून प्रचार करण्याच्या सूचना आयुक्तांनी या वेळी केल्या.
वसई-विरार शहर महापालिकेमार्फत महापालिका क्षेत्रातील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्याची, बलिदानाची माहिती तसेच त्यांच्या जीवनातील नैतिक मूल्यांवर आधारित सामाजिक ज्ञान याविषयीची माहिती देण्यात येत आहे. तसेच यावेळी उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन, निबंध, वकृत्व इत्यादी स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांचे समर्पित भक्तिगीत श्रवण आणि डॉक्युमेंटरीमधून श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे तेजोमयी जीवनचरित्र दर्शन, असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
-----------
या उपक्रमांतर्गत वसई-विरार शहर महापालिका घनकचरा विभागामार्फत दररोज विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
--------
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त महापालिका क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता या तिन्ही महत्त्वाच्या बाबींशी निगडित उपक्रमांद्वारे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या अलौकिक कार्याला सेवाभावी कामांतून आदरांजली अर्पण केली जात आहे. या उपक्रमांचा उद्देश तरुण पिढीने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करावी, हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com