डहाणू तालुक्यातील बावडे येथील बबन चुरी यांना ‘गुलाबाचा राजा–राणी’ पुरस्कार
बबन चुरी यांना पुरस्कार
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील बावडा येथील ज्येष्ठ गुलाब उत्पादक बबन चुरी यांना ‘गुलाबाचा राजा आणि गुलाबाची राणी’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेण्डस ऑफ द ट्रिज यांच्या वतीने रविवारी (ता. १५) रुपारेल कॉलेज, माटुंगा येथे आयोजित ६३व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हा गौरव करण्यात आला.
या वेळी ‘बेस्ट डिस्प्ले’सह १४ बक्षिसे आणि चार ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन देसाई, माजी गव्हर्नर हरजितसिंग तलवार, अशोक कोठारी, अरुण सावंत व चेअरमन चंद्रकांत साळुंके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास चुरी यांची मुलगी विपुला व जावई राजेश सावे उपस्थित होते. चुरी यांना १९८० मध्ये प्रथमच ‘गुलाबाचा राजा’ व ‘गुलाबाची राणी’ हे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले होते. १९९८ पर्यंत हा सन्मान त्यांनी सातत्याने मिळवला असून, हे दोन्ही पुरस्कार त्यांनी एकूण चार वेळा पटकावले आहेत. १९९९ मध्ये एशियन किंग ऑफ द रोज शो (जयपूर) येथेही त्यांनी ‘गुलाबाचा राजा’ पुरस्कार जिंकला होता. तब्बल २५ वर्षांनंतर यंदा पुन्हा एकदा त्यांनी हे देदीप्यमान यश संपादन केले आहे.
डहाणूतील बावडा येथे पाच एकर क्षेत्रावर त्यांची गुलाब शेती असून, दररोज विविध रंगांच्या सुमारे तीन हजार आणि गावठी गुलाबांची नऊ हजार फुले तोडली जातात. १९७७ मध्ये वसईच्या आगाशी येथील मेव्हणे देवराव पाटील यांनी १८० गुलाबाची रोपे भेट देत त्यांना फुलशेतीसाठी प्रोत्साहन दिले. पुढील वर्षी इंग्लिश गुलाबांची १० रोपे देण्यात आली, तर पुण्याहून २०५ रोपे आणली गेली. कलमबांधणीचे तंत्र, प्रदर्शनांतील सहभागासाठी मार्गदर्शन देण्यात आले. पत्नी शैला यांनीही अनेक वर्षे फुलविक्रीतून मोलाचे सहकार्य केले.
‘पाचु रोझेस’ या नर्सरीतून गुलाबांची कलमे विक्री केली जाते. २००२ पर्यंत त्यांच्या नर्सरीत ३५० गुलाबांच्या जाती होत्या; मात्र महापुरामुळे सध्या १३० जाती शिल्लक असल्याचे चुरी यांनी सांगितले. बावडा येथील रहिवाशी असून पंच्याहत्तर वर्षांचे बबन चुरी यांना गुलाब शेतीचा पन्नास वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे पुत्र विशाल प्रयोगशील शेतकरी असून शेतीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांच्या या गुलाबाच्या वाडीतून दररोज शेकडो गुलाब रोप विक्री केली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

