अपघातावरून दोन गटांत तुफान हाणामारी
कल्याणमध्ये किरकोळ अपघातावरून राडा
दोन गटांत तुफान हाणामारी; पोलिसांनाही धक्काबुक्की
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : कल्याण पूर्व येथील १०० फूट रोड परिसरात वाहन घासल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गट आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादाचे पर्यवसान भररस्त्यात तुफान हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाच्या धक्काबुक्कीचा सामना करावा लागला, ज्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १०० फूट रोड परिसरात दोन वाहनांचा एकमेकांना किरकोळ धक्का लागला. यावरून दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर रस्त्यावरील वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि समर्थकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. या झटापटीत तणावामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
कठोर कारवाईचे संकेत
हाणामारीत दोन नागरिकही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून आरोपींची ओळख पटवली जात आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

