देखभालीच्या नावाखाली फसवणूक

देखभालीच्या नावाखाली फसवणूक

Published on

केअरटेकरनेच निवृत्त महिलेला लुटले
साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

डोंबिवली, ता. १९ ः आयकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत, त्यांच्याच काळजीसाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेने पाच लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात संशयित केअरटेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या मधुरा विद्याधर बुधकर (वय ७१) यांच्या हातापायाला दुखापत झाल्याने त्यांनी जून २०२५ पासून एका ४० वर्षीय महिलेला काळजीवाहक (केअरटेकर) म्हणून कामावर ठेवले होते. ही महिला दररोज रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत त्यांच्या घरी वास्तव्यास असे. मधुराजींची हालचाल मर्यादित असल्याने याचाच फायदा घेऊन संबंधित महिलेने कपाटातील तिजोरीवर डल्ला मारला.

प्रकृती सुधारल्यानंतर गेल्या महिन्यात जेव्हा बुधकर यांनी कपाट तपासले, तेव्हा त्यांना सोन्याची बांगडी आणि पाटली गायब असल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचा संशय येऊ नये म्हणून चोरट्याने सोन्याची अंगठी आणि माळेच्या जागी हुबेहूब दिसणारे बनावट दागिने ठेवून दिले होते. सोनाराकडे तपासणी केल्यावर हे दागिने नकली असल्याचे स्पष्ट झाले. दागिन्यांबाबत विचारणा केली असता, पोलिस तक्रार करू नका, मी दागिने परत भरून देते, असे आश्वासन देऊन केअरटेकरने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मधुरा बुधकर यांनी विष्णुनगर पोलिसांत धाव घेतली.

एटीएम कार्डद्वारे बँक खात्यावर डल्ला
केवळ दागिनेच नव्हे, तर या महिलेने बुधकर यांच्या बँक खात्यातूनही तीन लाख ६१ हजार रुपये परस्पर लांबवले. दुखापतीच्या काळात मदतीसाठी जाताना या महिलेला एटीएमचा पिन कोड माहीत झाला होता. घरातून कार्ड चोरून ती पैसे काढायची आणि बुधकर यांच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेज संशय येऊ नये म्हणून डिलीट करायची, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com