१५ वर्षांच्या कामांची चौकशी चर्चेत

१५ वर्षांच्या कामांची चौकशी चर्चेत

Published on

बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मागील दीड दशकातील विकासकामांच्या चौकशीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने सुरू झालेल्या चौकशीमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रक्रियेत नेमके कोणाच्या जबाबदाऱ्यांची तपासणी होणार, याबाबत शहरभर चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शासकीय परिपत्रकांचे वाचन सुरू असताना शिवसेना शहरप्रमुखांनी आमदारांच्या पत्राचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या १५ वर्षांतील विकासकामांबाबत एसीबी चौकशी सुरू करण्यामागील उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घरघंटी व शिवणयंत्र वाटप प्रकरण; तसेच अग्निशमन वाहन खरेदीबाबतच्या तक्रारींची स्थिती काय, अशी विचारणाही करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनीच लोकार्पण केलेल्या वाहनांबाबत आता चौकशीचा विषय उपस्थित होत असल्याचा टोला लगावत, आमदारांशी चर्चा करूनच पुढील भूमिका घ्यावी, असे मत मांडण्यात आले. यावर भाजप गटनेते शरद तेली यांनी पालिकेचा कारभार पारदर्शक असायलाच हवा, असे सांगत पत्राचे समर्थन केले. भाजपचे राजेंद्र घोरपडे यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला.

सविस्तर हिशेब मागितला!
ठाणे अँटी करप्शन ब्युरोने नगर परिषद प्रशासनाला पत्र पाठवून २०१० ते २०२५ या कालावधीत झालेल्या सर्व विकासकामांची सविस्तर माहिती मागवली आहे. त्यामध्ये त्या काळातील मुख्याधिकारी व प्रशासक, संबंधित अधिकारी-कर्मचारी, कंत्राटदार, वॉर्डनिहाय नगरसेवक, मंजूर व अदा केलेली बिले, लेखाधिकारी, मोजमाप नोंद करणारे अभियंते, तसेच राज्य व केंद्र सरकारकडून वर्षनिहाय प्राप्त निधी आणि त्या निधीअंतर्गत झालेल्या सभा व निविदा प्रक्रियेचा तपशील समाविष्ट आहे. या व्यापक चौकशीमुळे जुन्या फाइल्स पुन्हा उघडल्या जाण्याची शक्यता असून, बदलापूरच्या राजकारणात पुढील काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com