भारताच्या नकाशात फुलली परसबाग!
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : बदलापूरपासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळोली गावातील केवळ २७ पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रमातून शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. मुख्य शिक्षिका तृप्ती अमोल पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात भारताच्या नकाशाच्या आकारात परसबाग फुलवण्यात आली आहे.
इको क्लबच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूंचा वापर करून ही परसबाग साकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भूगोल आणि शेतीचे प्रात्यक्षिक शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे या बागेत पिकणाऱ्या भाज्यांचा थेट मध्यान्ह भोजनात वापर केला जात असल्याने शाळा पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून देत आहे. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. विशाल पोतेकर, शालेय पोषण आहार अधीक्षिका नीलम पाटील आणि केंद्रप्रमुख योगेश डेंगाने यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागातून विविध उपक्रम राबवत असून, त्यांच्या सर्जनशीलतेला आणि बुद्धिमत्तेला या उपक्रमामुळे नवी चालना मिळत आहे.
फळभाज्यांसह औषधी वनस्पती
परसबागेत वांगी, टोमॅटो, दुधी भोपळा, शेवगा, भेंडी, मिरची, घेवडा यांसारख्या फळभाज्यांसह मेथी, पालक, कोथिंबीर या पालेभाज्या तसेच कोरफड, अडुळसा, गवती चहा, पुदिना, ओवा, पानफुटी अशा औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. अनेक तुळशींच्या रोपांनी सजलेली स्वतंत्र ‘ऑक्सिजन बाग’ हे या शाळेचे वैशिष्ट्य ठरले आहे.
देवळोली शाळेतील विद्यार्थी अतिशय हुशार आणि सर्जनशील आहेत. नवनवीन उपक्रम राबविण्यात नेहमी हिरारीने सहभागी होतात. त्यातूनच हा अनोखा उपक्रम आम्ही राबवला. सरकारच्या नियमानुसार प्रत्येक शाळेत परसबाग फुलवणे हे आवश्यक आहे. फक्त परसबाग न फुलवता या बागेतून एक देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही शाळेत ही परसबाग भारताच्या नकाशाच्या आकारात फुलवली आहे. विद्यार्थीही परसबागेची अतिशय काळजीपूर्वक जपणूक करत असतात.
- तृप्ती पेन्सलवार, मुख्य शिक्षिका,
देवळोली शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

