जुहूगावात कचऱ्याचा ढिगारा कायम

जुहूगावात कचऱ्याचा ढिगारा कायम

Published on

जुहूगावात कचऱ्याचा ढिगारा कायम
कचरा उचलल्याचा खोटा अहवाल देत नागरिकांची दिशाभूल
आरोग्य धोक्यात, संबंधितांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : जुहूगाव येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मैदानात मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, साफसफाईनंतर गोळा केलेला कचरा अनेक दिवसांपासून न उचलल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे कचरा हटविण्यात आल्याचा अहवाल देत नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी या मैदानात मद्यपींचा वावर वाढल्याने परिसरातील तरुण व ग्रामस्थांनी मनपाकडे तक्रार केली होती. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली. मात्र, गोळा करून ठेवलेला कचरा उचलण्यात आला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत जुहूगाव ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष हिमांशू पाटील यांनी मनपाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार नोंदवली होती.
मनपा अधिकाऱ्यांकडून कचरा हटविण्यात आल्याचे लेखी उत्तर देण्यात आले, परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता कचऱ्याचा ढिगारा जागेवरच असल्याचे दिसून आले. त्यामुळे चुकीचा अहवाल देऊन तक्रार बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डास, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच तत्काळ कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली आहे.

चौकट
कारवाईची मागणी
कचरा हटविल्याचा खोटा अहवाल सादर करून तक्रार निकाली काढण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्यक्षात मैदानात कचऱ्याचा ढिगारा कायम असल्याने डास, दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एकीकडे प्रशासन स्वच्छतेचा दावा करते आणि दुसरीकडे प्रत्यक्ष कामांची पाहणी न करताच तक्रारी निकाली काढल्या जातात. अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे धादांत खोटे असून, ही नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे.
- हिमांशू अ. पाटील (उपाध्यक्ष, जुहूगाव ग्रामस्थ मंडळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com