महायुतीत महापौर पदावरून धुसफुस

महायुतीत महापौर पदावरून धुसफुस

Published on

महायुतीत महापौरपदावरून धुसफूस
शिवसेनेला हवे सव्वा वर्षांनंतर महापौरपद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः महापौर रितू तावडे या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची धुरा सांभाळत आहेत; मात्र महापौरपदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. सव्वा वर्षांनंतर महापौरपदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने आग्रह धरला आहे. त्यामुळे पालिकेत सत्तासंघर्ष सुरू झाला असून भाजप कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेत महापौरपदी विराजमान होऊन काही दिवस झाले नाही तोच पालिकेत सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्याला सुरुवात झाली. शिवसेना (शिंदे) पक्षाला स्थायी समिती सव्वा वर्ष हवे होते. स्थायी समिती भाजपने आपल्याकडे ठेवली शिवसेनेला उपमहापौरपद आणि सुधार समिती देण्यात आले. त्यामुळे निर्णय घेण्याचे महत्त्वाचे अधिकार असलेल्या समित्या नसल्याने किमान महापौरपद सव्वा वर्षांनंतर शिवसेनेला द्यावे, यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे.
महायुतीत महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदावरून अजूनही धुसफूस सुरूच आहे. चार दशकांनंतर महापालिकेत भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहकार्याने सत्तास्थापनेचा कौल मिळाला आहे; मात्र महापौरपद, स्थायी समिती, सुधार समिती अशा महत्त्वाच्या पदावरून भाजप व शिंदे सेनेत चर्चा सुरू होती. अखेर भाजपला महापौर तर शिवसेनेला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. अडीच वर्षे भाजपचा महापौर असा तोडगा महायुतीत निघाला.

नगरसेवक नाराज
महापौरपद भाजपकडे गेल्याने शिंदे सेनेने स्थायी समितीवर दावा केला होता; मात्र पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यामुळे शिंदे सेनेचे नगरसेवक नाराज झाले असून महापौरपदावर दावा केला आहे. सव्वा वर्ष महापौरपद शिंदे सेनेकडे, अशी महायुतीत चर्चा झाल्याचे समजते. अडीच वर्षांऐवजी सव्वा वर्ष आता भाजपचा तर पुढील सव्वा वर्ष शिंदे सेनेचा महापौर यावर महायुतीत चर्चा सुरू असून त्याबाबत भाजप काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरपदाबाबत चर्चा सुरू
महापौरपदासाठी शिवसेनेच्या मागणीबाबत तोडगा लवकरच काढण्यात येणार असून त्याबाबत दोन्ही पक्षांत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com