

भिवंडी-निजामपूर शहर महापालिका महापौर निवडणुकीला नवे वळण
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना अचानक वेग आला असून, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाने अचानक प्रसिद्धिपत्रकाद्वारे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच भाजपमध्येही चांगलीच चर्चा रंगत आहे.
काँग्रेस व भाजप यांच्यात “सेक्युलर फ्रंट”च्या नावाखाली संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली असून, महाराष्ट्रात वेगळा राजकीय पॅटर्न पाहायला मिळणार का, याबाबत तर्कवितर्क रंगले आहेत. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३०, शिवसेनेचे १२, भाजपचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, समाजवादी पक्षाचे ६, कोणार्क विकास आघाडीचे ५ व भिवंडी विकास आघाडीचे ३ असे एकूण ९० नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच इतर आघाड्यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून सुरुवातीला नारायण चौधरी यांनी महापौरपदासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी अचानक स्नेहा मेहुल पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण चौधरी यांनी ‘सेक्युलर फ्रंट’सोबत जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यामुळे भाजपच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेत पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शहरात केला जात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या नगरसेवकांनीही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या सर्व घडामोडींमुळे भिवंडीच्या राजकारणातील पुढील राजकीय समीकरणे कशी जुळणार, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचा धक्कादायक निर्णय
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करून महापौरपदासाठी नारायण रतन चौधरी आणि उपमहापौरपदासाठी मोमीन तारिक अब्दुल बारी यांची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या निर्देशानुसार सर्व सदस्यांना व्हीप जारी करण्याचे पत्र काँग्रेस गटनेत्यांना देण्यात आले आहे. काँग्रेसने भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना राजकीय धक्का बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.