दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पिकअप मधून जीवघेणा प्रवास.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
बससेवा उपलब्ध नसल्यामुळे इतर वाहनांचा उपयोग
तारापूर, ता. २० (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २०) समोर आली आहे.
डहाणू तालुक्यातील ऐना, दाभोन साखरे, साखरे या भागांतील विद्यार्थी परीक्षेसाठी वाणगाव चिंचणी या मार्गावरून दररोज मालवाहक पिकअप या वाहनातून परीक्षेला जात असल्याचे समोर आले आहे. या भागातील परीक्षा केंद्र गावापासून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर असल्याने आणि नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी पिकअप वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
वाहतूक वाहनांमध्ये प्रवासी वाहतुकीस परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त अल्पवयीन विद्यार्थ्यांना नेले जात असून, अनेक जण उभे राहून तर वाहनाच्या मागील भागात बसून प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले आहे. अशा प्रवासामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन व वाहतूक प्रशासनावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने त्वरित विशेष बससेवा सुरू करावी किंवा शाळा व शिक्षण विभागाने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर घटनेसंदर्भात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही पालकांकडून देण्यात आला आहे.
....................
परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवाना असलेल्याच प्रवासी वाहनातून परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याच्या सूचना सर्व शाळा व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
- संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी, डहाणू
..................
दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून परीक्षा केंद्र १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहेत. प्रशासनाकडून कोणतीही बससेवा अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने मुलांना पिकअपमधून परीक्षा केंद्रावर जावे लागत आहे. सध्या मुलांच्या भवितव्याच्या प्रश्नासोबतच आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
- मधुकर धांगडा, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

