भिवंडीत महापौर पदाच्या तिरंगी लढतीत सेक्युलर फ्रंटचे भाजपा फुटीर गटाचे नारायण चौधरी विजयी

भिवंडीत महापौर पदाच्या तिरंगी लढतीत सेक्युलर फ्रंटचे भाजपा फुटीर गटाचे नारायण चौधरी विजयी

Published on

भिवंडीत काॅँग्रेसचा भाजपला धक्का

महापाैरपदी बंडखाेर नारायण चाैधरी, तर उपहापाैरपदी तारिक माेमीन

भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : राजकीय नाट्यमय घडामाेडींनंतर भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेक्युलर फ्रंटने बाजी मारली आहे. महायुतीतील शह-काटशहच्या राजकारणाचा फायदा उठवून भाजपच्या बंडखाेर गटाच्या साथीने या निवडणुकीत विजयश्री खेचून आणली आहे. भाजपच्या बंडखाेर गटाचे नारायण चाैधरी महापाैरपदी, तर काॅँग्रेसचे तारिक माेमीन उपमहापाैरपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत महायुती लढलेले भाजप व शिवसेना यांनी उभ्या केलेल्या स्वतंत्र उमेदवारांचा त्यांनी दारुण पराभव केला.

नारायण चौधरी यांना काँग्रेस ३०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १२ तर भाजपच्या बंडखाेर गटाचे सहा अशी ४८ मते मिळाली. शिवसेनापुरस्कृत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना कोणार्क विकास आघाडीची चार, शिवसेना १२, समाजवादी पक्ष सहा, तर भिवंडी विकास आघाडीचे तीन अशी २५ मते मिळाली, तर भाजपच्या स्नेहा मेहुल पाटील यांना अवघी १६ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तारिक मोमीन हे ४३ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना पुरस्कृत भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी (२५ मते), भाजपचे सुहास नकाते (२१ मते) यांचा पराभव केला. महापौरपदाच्या निवडणुकीत फुटीर गटासोबत असणारे सुहास नकाते यांना उपमहापौरपदासाठी भाजपने पक्षादेश दिला होता. भिवंडी पालिकेच्या आजच्या विशेष सभेस अपक्ष म्हणून लढलेले आणि नंतर कोणार्क विकास आघाडीत सहभागी झालेले नितेश ऐनकर विशेष सभेस गैरहजर राहिले. पालिका मुख्यालयात पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यासी अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.
महापौरपदाच्या शर्यतीतून काँग्रेसचे तारिक मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, शिवसेनेचे बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीचे मयूरेश पाटील, प्रतिभा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. नारायण चौधरी यांच्या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
-------
कडेकोट पाेलिस बंदोबस्त
विशेष सभेसाठी महापौरपदाचे उमेदवार विलास पाटील यांना कारागृहातून आणण्यात येणार असल्याने पालिका मुख्यालयास पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
----
भाजपची सहा मते फुटली
- महापाैरपदाच्या निवडणुकीत भाजपची सहा मते फुटली असून, त्यात महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांच्यासह प्रभाग क्रमांक १८मधील अबूसाद शेख, दीपा मढवी, अश्विनी फुटाणकर, सुहास नकाते, नंदिनी गायकवाड यांचा समावेश आहे. या सहा नगरसेवकांनी काँग्रेसप्रणित सेक्युलर फ्रंटला साथ दिली.
--
फुटीर उमेदवारच भाजपचा उमेदवार
महापाैरपदाच्या निवडणुकीत चाैधरी यांना मतदान करणारे सुहास नकाते हेच भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार होते. भाजप गटनेते संतोष शेट्टी यांनी याबाबत पक्षादेश जारी केला हाेता. उपमहापौरपदासाठी झालेल्या मतदानात नारायण चौधरीव्यतिरिक्त २१ जणांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com