आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास
मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

Published on

‘मेट्रो १२’चा लवकरच विस्तार

खासदार श्रीकांत शिंदेंकडून विविध प्रकल्पांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : कल्याणला मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या वाहतूक सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मार्फत उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-तळोजा ‘मेट्रो १२’च्या विस्तारीकरणाची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार ४१४ कोटींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे विस्तारित डोंबिवलीसह परिसरातील विविध प्रवाशांना फायदा होईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

विविध पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २०) घेतला. त्या वेळी ते बाेलत हाेते. ‘मेट्रो १२ अ’ मार्गिकेची घोषणा झाली असून, लवकरच हे काम सुरू केले जाणार आहे. ती कल्याण-शिळफाटा रस्त्याला समांतर धावणार असून कल्याण फाट्यावरून दहिसर मोरीमार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत ही सेवा जाणार असल्याने शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत हाेईल, असेही खासदार शिंदे म्हणाले.

खासदार शिंदे यांच्या मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेत काही वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली असून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग आणि रेल्वे पूल अशा प्रकल्पांना गती मिळाली आहे. एमएमआरडीएच्या २०२६-२७ अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी चार हजार ८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पलावा उड्डाणपूल, तिसरा पत्रीपूल, वालधुनी नदीलगत उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या कामांची पाहणीही यादरम्यान शिंदेंकडून करण्यात आली.
------
असा हाेणार विस्तार
- विस्तारित ‘मेट्रो १२ अ’ मार्गिका कल्याण-मानपाडा-काटई नाका-कल्याण फाटामार्गे विद्यमान लाइनला खुटारी गावाजवळ जोडली जाणार आहे. त्यानंतर ती तळोजा रेल्वे स्थानकापर्यंत जाईल.
- काटई नाका ते कल्याण फाट्यादरम्यान प्रस्तावित मेट्रो १४ सोबत कॉमन ट्रॅक आणि स्टेशन शेअरिंग होणार आहे. निळजे डेपो, मेट्रो १४ तसेच बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाशी जोडणीही प्रस्तावित आहे.
- एकूण लांबी १८.४ किमी असून सुमारे १०.५ किमीवर काम सुरू आहे. विस्तारित डाेंबिवलीसह मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, गोठेघर, दहिसर मोरी आदी भागांना या मार्गांचा लाभ होणार आहे.
...............
डबल डेकर उन्नत मार्गाला मंजुरी
शिळफाटा ते भिवंडीजवळील राजनोली जंक्शनदरम्यान डबल डेकर उन्नत मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. १९.४० किमी लांबीच्या या मार्गावर खालच्या स्तरावर रस्ता आणि वरच्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. काटई नाका, पत्रीपूल, गोविंदवाडी बायपासमार्गे हा मार्ग उभारला जाणार आहे. त्याचा समावेश ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो मार्गाशीही होईल. या सर्व प्रकल्पांमुळे ठाणे महानगर क्षेत्रातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.....................
कल्याण ते तळोजा या ‘मेट्रो १२’ मार्गाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या विस्तारित मार्गात कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com