मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार
मुंबईत आता स्मार्ट प्रवास!
एमएमआरडीएचा ‘ट्रान्सपोर्ट स्टॅक’ उपक्रम; विविध वाहतूक पर्याय एका सूत्रात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा एमएमआरडीएद्वारे ‘मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक’ हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. ‘ओपन डेटा एक्स्चेंज प्लॅटफॉर्म’द्वारे मुंबईचे संपूर्ण वाहतूक जाळे एका सूत्रात बांधण्यात येणार आहे. ट्रेन, बस आणि मेट्रोचे नेमके लोकेशन, प्रवासाचे नियोजन आणि पार्किंग उपलब्धतेची रिअल-टाइम माहिती मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांसाठी स्वस्त आणि अत्याधुनिक प्रवासाचे पर्याय खुले होणार आहेत.
मुंबईची वाहतूक व्यवस्था सुसह्य आणि एकसंध करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक या पथदर्शी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जिका) सोबत भागीदारी केली आहे. जगभरातील शहरांना डेटा-आधारित वाहतूक व्यवस्था उभारण्यात मदत करणाऱ्या जीआयसीएचे या प्रकल्पाला सहकार्य मिळणार आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, महा मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएचे उपमहानगर आयुक्त अजिंक्य पडवळ यांनी जीआयसीएच्या विज्ञान, तंत्रज्ञान माहिती आणि डिजिटल परिवर्तन कार्यालयाचे वरिष्ठ संचालक यामाडा टोमोयुकी आणि उपसंचालिका नायमुरा मालिको यांच्याशी सविस्तर चर्चा करून या उपक्रमाची सुरुवात केली.
‘मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक’ म्हणजे नक्की काय?
ही एक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. हे स्टँडर्ड डेटा एक्स्चेंज प्रोटोकॉल्स अँड द मोबिलिटी ॲज अ सर्व्हिस (मास) या तत्त्वावर आधारित असून, याद्वारे मेट्रो, बस, रेल्वे आणि इतर सर्व वाहतूक साधने एकमेकांशी जोडली जातील. नागरिक, ऑपरेटर आणि सरकार यांच्यासाठी ही एक एकात्मिक आणि सुलभ वाहतूक व्यवस्था असेल.
प्रवाशांना काय फायदे?
- पूर्ण प्रवासाची तिकीट बुकिंग : एकाच ठिकाणाहून प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे तिकीट बुक करता येईल.
- रिअल-टाइम ट्रॅकिंग : ट्रेन, बस आणि मेट्रोचे नेमके लोकेशन मोबाईलवर पाहता येईल.
- प्रवासाचे नियोजन : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध वाहतूक साधनांचा वापर करून प्रवासाचे नियोजन सोपे होईल.
- रिअल-टाइम पार्किंगची माहिती : पार्किंग उपलब्धतेची रिअल-टाइम माहिती मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

