वेल्स संसदेला विधीमंडळ प्रतिनिधींची भेट

वेल्स संसदेला विधीमंडळ प्रतिनिधींची भेट

Published on

वेल्स संसदेला विधिमंडळ प्रतिनिधींची भेट
शाश्वत विकास, जागतिक बदलावर मंथन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः इंग्लंडमधील वेल्स संसदेला महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने भेट दिली. या भेटीदरम्यान शाश्वत विकास आणि भविष्योन्मुख धोरणांसंदर्भात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपले विचार मांडले.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की गेल्या काही दशकांमध्ये जग मोठ्या प्रमाणात बदलले आहे. १९४४ ते १९९० या कालखंडात लोकशाही, विकास आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न झाला; परंतु १९९० नंतर जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील झपाट्याने वाढ, स्थलांतर आणि अस्मितांच्या राजकारणामुळे जगाचे स्वरूप बदलले. सहस्रक विकास उद्दिष्टांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांपर्यंतचा प्रवास हा मानवकेंद्री विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये ‘फ्युचर कमिशनर’ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतातही २०४७ पर्यंतचे विकास ध्येय निश्चित करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून त्याचा कालांतराने आढावा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत विशेष आग्रह धरल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. या अभ्यास दौऱ्यात दोन विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. वेल्स सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्ट विभागाचे प्रमुख लॉइड हॅरिस यांनी वेल्स सरकारच्या सात प्रमुख उद्दिष्टांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण केले. तर फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांनी मॅनेजिंग चेंज या विषयावर मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शनाची जबाबदारीही डॉ. गोऱ्हे यांनी पार पाडली. या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना वेल्स संसदेच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. प्रतिनिधी मंडळाने वेल्स संसद परिसराची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली.
....

Marathi News Esakal
www.esakal.com