ठाणे घोडबंदर रस्ता ठरतोय पांढरा हत्ती

ठाणे घोडबंदर रस्ता ठरतोय पांढरा हत्ती

Published on

घोडबंदर रस्ता ठरतोय ‘पांढरा हत्ती’
पुन्हा राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर राज्य महामार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च पेलणे मिरा-भाईंदर महापालिकेला कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरात या रस्त्यावर तब्बल आठ कोटी रुपये खर्च झाल्याने, पालिकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण आला आहे. परिणामी, हा रस्ता पुन्हा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या महासभेत सर्वानुमते घेण्यात आला.

फाउंटन ते गायमुख हा रस्ता सध्या ३० मीटर रुंद असून, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे येथे सतत वाहतूक कोंडी आणि रस्ते खराब होण्याचे प्रकार घडतात. राज्य सरकारने हा रस्ता ६० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला असून, याचे काम एमएमआरडीए स्वखर्चाने करणार आहे; मात्र यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पालिकेला करायचे होते. याच कारणास्तव गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता महापालिकेकडे सोपवला होता.

पालिकेची आर्थिक कसरत
रस्ता ताब्यात आल्यापासून त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी पालिकेवर आली. गेल्या पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने पालिकेला दोन टप्प्यांत आठ कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करावी लागली. एकीकडे शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे निधीअभावी रखडलेली असताना आणि कंत्राटदारांची देणी थकलेली असताना, या महामार्गावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करणे पालिकेला झेपणारे नाही.

हस्तांतरामागची तांत्रिक कारणे
भूसंपादनाचा संथ वेग : रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.
पर्यावरणीय परवानग्या : या रस्त्याच्या विस्तारासाठी सीआरझेड आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परवानग्या आवश्यक आहेत, ज्या मिळण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
देखभालीचा बोजा : जोपर्यंत प्रत्यक्ष रुंदीकरण सुरू होत नाही, तोपर्यंत दरवर्षी होणारा देखभालीचा खर्च पालिकेला परवडणारा नाही. या सर्व बाबींचा विचार करून, महासभेने हा रस्ता पुन्हा राज्य सरकारकडे (सार्वजनिक बांधकाम विभाग) वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेची आर्थिक बचत होणार असली, तरी रस्त्याचे रुंदीकरण कधी मार्गी लागणार, हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com