जिल्ह्याचा प्रशासकीय विस्तार
जिल्ह्याचा प्रशासकीय विस्तार
वसई, पालघर आणि डहाणूत अतिरिक्त तहसील कार्यालये मंजूर
पालघर, ता. २१ : जिल्ह्यातील वाढते नागरीकरण, विस्तीर्ण भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येचा वाढता भार लक्षात घेता, राज्य सरकारने जिल्ह्यात प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू या तीन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये आता अतिरिक्त तहसील कार्यालये आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन केली जाणार आहेत. या निर्णयामुळे प्रशासकीय कामांना वेग येणार असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालघर, डहाणू आणि वसई हे तिन्ही तालुके पश्चिम रेल्वेने जोडलेले असून येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि नागरी विकास होत आहे. २०११च्या जनगणनेच्या तुलनेत सध्या या भागाची लोकसंख्या दुपटीने वाढली असल्याचा अंदाज आहे. विशेषतः वसईची लोकसंख्या २० लाखांच्या उंबरठ्यावर आहे. तसेच पालघर आणि डहाणू हे तालुके सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तिन्ही क्षेत्रांत विभागलेले आहेत. तालुक्याचे मुख्यालय लांब असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना कामासाठी मोठा प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर अपुरे मनुष्यबळ आणि कामाचा वाढता डोंगर यामुळे सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे आता नवीन अतिरिक्त तहसील कार्यालयांच्या निर्मितीमुळे कामाचे विभाजन होईल. महसूल मंडळ, तलाठी सजा आणि स्थानिक लोकसंख्या यांचा विचार करून ही कार्यालये सोयीच्या ठिकाणी उभारली जातील. यामुळे दाखले मिळवणे, जमिनीचे प्रश्न आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना आता मुख्य तहसील कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागणार नाही.
भौगोलिक स्थितीमुळे अडथळे
पालघर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये विभागलेला आहे. प्रशासकीय कामांसाठी येथे १० महसूल मंडळे आणि ६३ तलाठी सजा कार्यरत आहेत. वसई मुंबईला लागून असलेला वसई तालुका हा पूर्णपणे उपनगरीय भाग म्हणून विकसित झाला आहे. या तालुक्यात नऊ महसूल मंडळे, ५१ तलाठी सजा असून एकूण १२५ महसुली गावे आणि ३१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. डहाणू हा मुख्यत्वे दुर्गम डोंगरी आणि विस्तीर्ण सागरीपट्ट्याचा तालुका आहे. गेल्या १५ वर्षांत या तिन्ही तालुक्यांच्या लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रामुळे सध्याची प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे.
प्रशासनावरील ताण होणार कमी
सध्याची लोकसंख्या लक्षात घेता सरकारी कार्यालयातील प्रशासन अपुरे पडत आहे. तर सध्या असलेल्या मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त तणाव आहे. नागरिकांना कार्यालयात त्यांची कामे करण्यासाठी वेळ जात आहे. तालुक्याचे मुख्यालय लांब असल्याने नागरिकांचा प्रवासात वेळ जात आहे. त्यातच खर्चही होत आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून शासनाने अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासन अधिक गतिमान होणार असून लोककेंद्रित शासन होण्यास मदत होणार आहे.
विकासाला गती मिळणार
तहसील कार्यालय निर्मितीकरिता महसूल मंडळ, तलाठी कार्यालये, लोकसंख्या, भौगोलिक स्थिती आणि विस्तारीकरण, ग्रामीण भागातील वाढीव मंडळे आदी बाबींचा विचार नवीन कार्यालयांसाठी केला जाणार आहे. प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करणे, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असून, यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय सद्यस्थितीवर एक नजर
तालुका २०११ची लोकसंख्या सध्याचा अंदाज भौगोलिक वैशिष्ट्ये
वसई १३.४३ लाख १६ ते २० लाख पूर्णतः नागरी आणि मुंबई उपनगराचा भाग
पालघर ५.५० लाख ८ ते १० लाख सागरी, नागरी आणि डोंगरी क्षेत्राचे मिश्रण
डहाणू ४.०२ लाख ७ ते ८ लाख प्रामुख्याने डोंगरी आणि सागरी पट्टा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

