नळाला पाणी नाही, पण बिल वाढलं!
पाणी नाही; पण बिल वाढले!
उल्हासनगरकरांना पाणीपट्टी दरवाढीचा झटका
प्रशासनाचा दुप्पट-तिप्पट वाढीचा प्रस्ताव महासभेने फेटाळला; वादाअंती मर्यादित दरवाढीवर शिक्कामोर्तब
उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : शहरात दूषित, अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक आधीच हैराण असताना, उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत त्यांच्यावर पाणीपट्टी दरवाढीचा बोजा लादण्यात आला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या दुप्पट-तिप्पट दरवाढीच्या प्रस्तावावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला. अखेर, नगरसेवकांच्या तीव्र विरोधामुळे मूळ प्रस्तावाला कात्री लावत मर्यादित दरवाढीला मंजुरी देण्यात आली.
महासभेच्या अजेंड्यावर पाणीपट्टी दरवाढीचा विषय येताच सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी प्रशासकीय धोरणांवर सडकून टीका केली. शहरातील अनेक भागांत आजही एकाआड दिवशी पाणी येते, त्यातही ३० ते ४० टक्के पाणीगळती होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागरिकांचे फोन उचलत नाहीत आणि पाणी समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा दावा करत ७८ पैकी निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘आधी पाणी द्या, मगच दरवाढ करा,’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.
प्रशासनाचा ‘९० कोटीं’चा डाव
पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आरसीसी घरांसाठी ३,६०० रुपयांऐवजी थेट ८,००० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पत्र्याच्या घरांसाठी आणि झोपडपट्ट्यांसाठीही अशाच प्रकारे भरमसाट वाढ सुचवण्यात आली होती. या दरवाढीतून पालिकेला वर्षाला सुमारे ९० कोटी ८३ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित होते; मात्र नागरिकांच्या रोषाला घाबरलेल्या लोकप्रतिनिधींनी याला कडाडून विरोध केला.
आयुक्तांचे कारवाईचे आश्वासन
आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणीपुरवठ्यातील त्रुटी मान्य केल्या असून, हलगर्जी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, मालमत्ता कर आणि पाणीबिले वेगवेगळी पाठवून गोंधळ वाढवला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय प्रस्तावाला कात्री लागली असली तरी मूलभूत सुविधा न सुधारता केलेली ही दरवाढ उल्हासनगरकरांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे.
पाणीपट्टी दरवाढ
घराचा प्रकार सध्याची पाणीपट्टी (वार्षिक) प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर झालेली दरवाढ
आरसीसी घरे ३,६०० रुपये ८,००० रुपये ४,४०० रुपये
पत्र्याची घरे १,८०० रुपये ६,५०० रुपये २,४०० रुपये
झोपडी/लफाटे १,२०० रुपये ३,००० रुपये १,५०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

