ठाण्यात हवा प्रदूषण वाढले
ठाण्यात प्रदूषणाचा विळखा
२८ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा; सव्वापाच लाखांचा दंड वसूल
ठाणे, ता. २१ ः शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या धुळीने आणि वाहतूक कोंडीमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ‘मध्यम प्रदूषित’ गटात पोहोचली आहे. प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या विकसकांवर ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, जानेवारी महिन्यात २८ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावत पाच लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात मेट्रो, उड्डाणपूल आणि गृहप्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने १ ते २२ जानेवारीदरम्यान ३३ बांधकामस्थळांची अचानक तपासणी केली. त्यापैकी २८ ठिकाणी धूळ नियंत्रणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. वारंवार सूचना देऊनही उपाययोजना न करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
महापालिकेने शहरात मिस्ट स्प्रे यंत्रणा आणि हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रे बसविली असली, तरी प्रदूषणाचा आलेख खाली येताना दिसत नाही. फेब्रुवारीतील सर्वेक्षणानुसार, ठाण्याचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ११५ नोंदवला गेला आहे. १०१ ते २०० या दरम्यान असलेला निर्देशांक हा ‘मध्यम प्रदूषित’ (पिवळा गट) मानला जातो.
सर्वात प्रदूषित भाग
वर्तकनगर येथे सर्वाधिक १२८ एक्यूआय नोंदवला गेला, तर कोपरी प्रभाग कार्यालय परिसरात १२३ इतका निर्देशांक होता. नौपाडा, कासारवडवली आणि उपवन परिसरातही हवा प्रदूषित असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयांत गर्दी
वाढत्या प्रदूषणामुळे ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेतील धुळीच्या कणांमुळे नागरिक सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाच्या विकारांनी त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत खासगी दवाखान्यांमध्ये अशा तक्रारी असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमालीचे वाढले असून, दररोज ५० ते ६० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
नागरिकांना तक्रारीचे आवाहन
प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांच्या सहभागाचीही गरज आहे. जर कोठे बांधकामामुळे धूळ उडत असेल किंवा प्रदूषण होत असेल, तर महापालिकेने दिलेल्या हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रांसह तक्रार करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

