महापालिका शाळेत क्षयरोग निदान केंद्र

महापालिका शाळेत क्षयरोग निदान केंद्र

Published on

महापालिका शाळेतच क्षयरोग निदान केंद्र
तीन विद्यार्थ्यांना लागण झाल्याचा संशय; महापौरांकडून प्रवेशद्वार बदलण्याचे आदेश

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा रोड येथील महापालिकेच्या शाळेत एकच सामाईक प्रवेशद्वार असल्याने रुग्ण आणि विद्यार्थ्यांचा थेट संपर्क येत असून, यामुळे शाळेतील तीन विद्यार्थ्यांना क्षयरोगाची (टीबी) लागण झाल्याचा खळबळजनक संशय व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस नगरसेविका रुबिना शेख यांनी महासभेत हा मुद्दा मांडल्यानंतर, महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आणि शाळा व केंद्राचे प्रवेशद्वार वेगळे करण्याचे आदेश दिले आहेत.

मिरा रोड येथील महापालिका शाळेच्या तळमजल्यावर पालिकेचे क्षयरोग निदान केंद्र कार्यरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या केंद्रात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी एकाच प्रवेशद्वाराचा वापर करतात. महासभेत शैक्षणिक साहित्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना रुबिना शेख यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. रुग्ण आणि विद्यार्थी एकाच मार्गाने येत-जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला असून, शाळेतील तीन विद्यार्थ्यांना याची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती शेख यांनी सभागृहात दिली. विद्यार्थी आणि रुग्ण यांचा संपर्क टाळण्यासाठी तातडीने स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित हा विषय अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शाळा आणि निदान केंद्र या दोघांचे प्रवेशद्वार त्वरित वेगळे करावेत, जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शैक्षणिक साहित्य आता थेट मिळणार
महासभेत महापालिका शाळेतील सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि इतर साहित्याबाबत महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत गणवेश, बूट आणि मोजे खरेदीसाठी पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते; मात्र या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महापालिका स्वतः दर्जेदार साहित्य खरेदी करून ते विद्यार्थ्यांना देणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे साहित्य मुलांच्या हातात पडावे, यासाठी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सदस्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com