पाळीव श्वानाचा चावा

पाळीव श्वानाचा चावा

Published on

पाळीव श्वानाचा सहावर्षीय मुलाला चावा
मालक बापलेकीविरोधात गुन्हा दाखल
ठाणे, ता. २१ : चाळीच्या आवारात खेळणाऱ्या सहावर्षीय चिमुरड्यावर पाळीव श्वानाने हल्ला करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी जखमी मुलाच्या नातेवाइकांनी जाब विचारला असता, त्यांना शिवीगाळ करीत पुन्हा श्वान अंगावर सोडण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिसांनी कुत्र्याची मालकीण आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जयेश गुप्ता हे शहीद भगतसिंग रोड परिसरात राहतात. त्यांचा पुतण्या रुद्रा (६) १९ फेब्रुवारीला सकाळी ६:३०च्या सुमारास चाळीतील शिवमंदिराच्या आवारात मित्रांसोबत खेळत होता. त्या वेळी परिसरात राहणारे समृद्धी विश्वकर्मा आणि संजीत विश्वकर्मा यांचा पाळीव श्वान अचानक रुद्रावर धावून गेला. श्वानाने रुद्राच्या मांडीला जोराने चावा घेतल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि घाबरून रडू लागला. परिसरातील एका व्यक्तीने वेळीच हस्तक्षेप करून कुत्र्याला दूर केल्यामुळे मोठी दुखापत टळली.

या घटनेनंतर जयेश गुप्ता यांनी कुत्र्याच्या मालकिणीला सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याला सुरक्षिततेसाठी मास्क (मझल) का लावला नव्हता, असा जाब विचारला. या साध्या प्रश्नावर कुत्र्याची मालकीण समृद्धी हिने संताप व्यक्त केला. तिने गुप्ता कुटुंबाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि पुन्हा आलात तर श्वान अंगावर सोडेन, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर गुप्ता कुटुंबाने वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी समृद्धी संजीत विश्वकर्मा आणि संजीत उमाशंकर विश्वकर्मा या दोघांविरुद्ध हलगर्जी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com