मेल-एक्सप्रेसमधील सराईत चोर जेरबंद; २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
रेल्वेमधील चोर अटकेत
२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅगा व पर्स चोरून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोराला लोहमार्ग मुंबई पोलिसांच्या विशेष कृती दलाने अटक केली आहे. आरोपीकडून १४७ ग्रॅम सोन्याच्या सहा लगड्या व ५५ ग्रॅम चांदीची एक लगड असा एकूण सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला विनय रमेशचंद्र सोनी (वय ३८, रा. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) हा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट काढून प्रवासी असल्याचे भासवत असे. रात्री प्रवासी झोपेत असताना त्यांच्या उशाजवळ, सीटखाली किंवा बर्थखाली ठेवलेल्या सॅक बॅग, ट्रॉली बॅग आणि पर्स चोरून तो पसार होत असे. चोरी केलेले सोन्याचे दागिने वितळवून त्याच्या लगड्या तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कल्याण रेल्वे पोलिस ठाणे येथे नोंद असलेल्या तक्रारीनुसार, १३ जून २०२५ मध्ये पटना एक्स्प्रेसने प्रवास करताना एका प्रवाशाची ट्रॉली बॅग चोरीस गेली होती. त्या बॅगेत सुमारे ६३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व अन्य साहित्य होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून अटक
मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग मुंबई पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर १४ जानेवारीला सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
मुद्देमाल जप्त
तपासात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यातील सहा गुन्ह्यांमधील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच १७ व १८ जानेवारीला कानपूर येथे जाऊन उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी विशेषतः रात्रीच्या प्रवासात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

