‘करिअर स्टेशन’मुळे व्यावसायिक करिअरला गती

‘करिअर स्टेशन’मुळे व्यावसायिक करिअरला गती

Published on

नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : जॉब फेअरमुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांसमोर स्वतःची क्षमता सादर करण्याची संधी मिळते, तर कंपन्यांना योग्य उमेदवारांची निवड सुलभ होते. त्यामुळे महाविद्यालयीन जॉब फेअर हा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो. हीच बाब लक्षात घेत वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड बिझनेस मॅनेजमेंटतर्फे महाविद्यालयामध्ये शनिवारी (ता. २१) करिअर स्टेशन या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयात आयोजित केलेला जॉब फेअर हा विद्यार्थ्यांना आणि पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा उपक्रम असतो. या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट महाविद्यालयात येऊन भरती प्रक्रिया राबवतात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रतिभावान पदवीधर व नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांशी जोडणारे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सुमारे ३० नामांकित कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी झाल्या आहेत. आयटी, तसेच नॉन-आयटी क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या जॉब फेअरमध्ये एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि सदरलँड ग्लोबल सर्व्हिसेस या नामांकित कंपन्यांचा समावेश असून, विविध उद्योग क्षेत्रांतील इतरही अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्या होत्या.

करिअर स्टेशनमध्ये सकाळ समूह माध्यम प्रायोजक लाभला. जॉब फेअरमुळे सर्व पदवीधर तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर पर्याय जाणून घेण्याची, जागेवरच मुलाखती देण्याची आणि कंपन्यांमधील एचआर प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. रोजगार क्षमता वाढवणे आणि शैक्षणिक क्षेत्र व उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

महाविद्यालयामध्ये जॉब फेअर आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्राशी जोडले जाण्यास मोठी मदत झाली आहे. एकाच ठिकाणी विविध नामांकित कंपन्यांच्या एचआर प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला. जागेवरच मुलाखत देणे आणि करिअरविषयक मार्गदर्शन मिळाल्यामुळे भविष्यातील दिशा स्पष्ट झाली.
- नंदिनी शर्मा, विद्यार्थिनी

आमच्या महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉलेज, अकॅडमीमध्ये आम्ही जे काही शिकलोय ते आम्हाला कंपनीतील एचआरसमोर मांडता येईल. पुढे आम्हाला नोकरी क्षेत्रात सहज उतरता येईल.
- संजना कोळसकर, विद्यार्थिनी

‘करिअर स्टेशन २०२६’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी थेट जोडणारा महत्त्वपूर्ण पूल ठरला आहे. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढवणे हा या जॉब फेअरचा मुख्य उद्देश आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना योग्य करिअर दिशा मिळते. भविष्यातही अधिकाधिक नामांकित कंपन्यांना सहभागी करून विद्यार्थ्यांसाठी अशा संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- डॉ. नित्या वर्गीस, मुख्याध्यापक, वेस्टर्न कॉलेज

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानावर न थांबता कौशल्य विकासावरही भर दिला पाहिजे. संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योगजगताच्या गरजांची जाणीव ही यशाची गुरुकिल्ली आहे. महाविद्यालयामार्फत आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. यामुळे त्यांच्या करिअरच्या वाटचालीला योग्य दिशा मिळते.
- नीलम कत्याल, प्लेसमेंट ऑफिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com